सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
दि. 21 डिसेंबर
चामोर्शी:(प्रतिनिधी) वाघधरा गावात अवैध दारूविक्रीमुळे वाढत असलेल्या सामाजिक समस्यांना आळा घालण्यासाठी वागदरा येथे महिला बचत गटाने पुढाकार घेत दारू विक्रेत्यांवर धाड घातली. या कारवाईत चार आरोपींच्या घरी शोधमोहीम राबविण्यात आली असता त्यांच्या घरातून दारूच्या निपा व मोहफुलांची दारू आढळून आली.
महिला बचत गटातील महिलांनी सर्व जप्त दारूसह थेट पोलिस ठाणे गाठत संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार नानाजी अंकतवार, कविता मडावी, घनश्याम मेश्राम आणि ललिता रवी माझी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत बीट जमादार दुर्गे मेजर, तंटामुक्ती अध्यक्ष बंडू वाळके, ग्रामपंचायत सदस्य परशुराम कुळमेथे, पोलीस पाटील अनिल कुकुडकर तसेच दिनेश मडावी यांनी सहकार्य केले. महिला बचत गटाच्या या धाडसी भूमिकेचे गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत असून अवैध दारूविक्रीविरोधात कडक कारवाईची मागणी होत आहे.