HomeBreaking Newsजंगलातून लोहखनिजाची लूट! बिनानंबर ट्रॅक्टर जप्त, FIR नोंद न होण्याने सत्ता–साठेबाज संगनमताचा...

जंगलातून लोहखनिजाची लूट! बिनानंबर ट्रॅक्टर जप्त, FIR नोंद न होण्याने सत्ता–साठेबाज संगनमताचा संशय

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

कोरची (गडचिरोली प्रतिनिधी)

जल–जंगल–जमिनीसाठी रस्त्यावर उतरले ग्रामस्थ!

झेंडेपार ग्रामसभेची अवैध उत्खननाविरोधात धडक कारवाई; बिनानंबर ट्रॅक्टर जप्त

प्रशासन गप्प का? FIR नसल्याने संशय अधिक गडद

कोरची (गडचिरोली प्रतिनिधी):
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील झेंडेपार ग्रामसभेने जल–जंगल–जमिनीच्या रक्षणासाठी थेट संघर्षाचा झेंडा फडकावला आहे. दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी ग्रामसभेच्या गस्ती दरम्यान जंगलातून लोहखनिज व दगड-गोटे अवैधरित्या वाहतूक करणारे बिनानंबर प्लेटचे ट्रॅक्टर रंगेहात पकडून जप्त करण्यात आले. या कारवाईने अवैध उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले असून, त्यांच्या पाठीशी असलेल्या ‘अदृश्य शक्तीं’वरही संशयाची सुई फिरू लागली आहे.

विशेष म्हणजे, जप्त ट्रॅक्टरना नंबर प्लेट नव्हती आणि अद्याप त्यांचे मालक कोण आहेत, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे या संपूर्ण रॅकेटमागे मोठ्या व्यक्तींचा हात असल्याचा गंभीर संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

ग्रामसभेने या प्रकरणी पोलीस व महसूल प्रशासनाकडे तक्रार दाखल करूनही अद्याप FIR नोंद न होणे ही बाब प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. कायद्याचा उघड भंग होत असताना यंत्रणा शांत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

झेंडेपार व सोहले परिसरात लोहखनिज उत्खननासाठी यापूर्वी जनसुनावण्या झाल्या असल्या, तरी ग्रामसभेचा ठाम विरोध कायम आहे.
“हे जंगल आमचे जीवनाधार आहे. आमची संस्कृती, उपजीविका आणि अस्तित्व याच जंगलावर अवलंबून आहे—आम्ही जंगल देणार नाही!” अशी स्पष्ट भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

ग्रामपंचायतची NOC नसताना, तसेच ग्रामसभा व ग्रामपंचायत यांची अधिकृत संमती न घेता उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले आहे. कंपन्यांकडून स्थानिकांना आमिष दाखवून कामावर घेणे आणि बेकायदेशीर उत्खनन करणे, हा थेट कायद्याचा आणि पेसा कायद्याचा भंग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा संताप उफाळून आल्याने, अखेर ग्रामसभेने स्वतः पुढाकार घेत अवैध उत्खनन करणारे ट्रॅक्टर जप्त करून आपली एकजूट व ताकद दाखवून दिली. ही कारवाई पेसा कायद्यान्वये मिळालेल्या अधिकारांचा ठोस वापर असल्याचे ग्रामसभेने स्पष्ट केले आहे.

“ग्रामपंचायतची NOC नाही, ग्रामसभेचा पूर्ण विरोध आहे—तरीही जे कोणी जंगलात घुसून लूट करत असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. आम्ही कोणालाही सोडणार नाही,” असा कडक इशारा ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सध्या जप्त ट्रॅक्टर ग्रामसभेच्या ताब्यात असून, संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस व महसूल विभागाला देण्यात आली आहे. मात्र FIR नोंद न होणे, दोषींची ओळख न पटणे आणि प्रशासनाचे मौन यामुळे जनआक्रोश दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही आणि अवैध उत्खनन कायमस्वरूपी थांबत नाही, तोपर्यंत झेंडेपार ग्रामसभेचा जल–जंगल–जमिनीचा लढा अधिक तीव्र केला जाईल.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments