दोन सख्या आदिवासी भावंडांचा मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (NCST), नवी दिल्ली कडून दखल
जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याची ‘सीटिंग नोटीस’
गडचिरोली(उपसंपादक)
अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे मूलभूत आरोग्य सुविधांच्या अभावामुळे व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सप्टेंबर 2024 मध्ये वेलादी आदिवासी कुटुंबातील दोन सख्या भावंडांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. अधिक दुर्दैवी बाब म्हणजे, मृतदेह वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध नसल्याने त्या दोन्ही बालकांचे मृतदेह आई-वडिलांना तब्बल 15 किलोमीटर जंगलमार्गे खांद्यावर उचलून न्यावे लागले होते.
या गंभीर घटनेची दखल घेत आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हा प्रभारी विनोद मडावी व जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी थेट राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (NCST), नवी दिल्ली येथे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची गंभीर नोंद घेत आयोगाने आता थेट जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याची ‘सीटिंग नोटीस’ बजावली असल्याची माहिती आहे.
महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी सुमारे 8 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना खुलासा मागविण्याची नोटीस देण्यात आली असल्याचेही वृत्त आहे. मात्र समाधानकारक कार्यवाही न झाल्याने आता आयोगाने 19 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बोलावले आहे. त्यामुळे या प्रकरणावर प्रशासनाची कसोटी लागली आहे.
आजाद समाज पार्टीने या प्रकरणात ▪️ पीडित आदिवासी कुटुंबाला योग्य व तात्काळ नुकसानभरपाई, ▪️ जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई, ▪️ गावपातळीवर आरोग्य सेवेसाठी स्थानिक पुजारी व स्वयंसेवकांचे प्रशिक्षण, ▪️ आदिवासी दुर्गम भागात विशेष आरोग्य योजना, रुग्णवाहिका, प्रसूती केंद्र व वैद्यकीय सुविधा या ठोस मागण्या आयोगासमोर मांडल्या होत्या.
NCST च्या या थेट हस्तक्षेपामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येणार का ?, दोषींवर कारवाई होणार का ? आणि पीडित आदिवासी कुटुंबाला न्याय मिळणार का ?, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून, आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था उघड करणारा गंभीर इशारा ठरत आहे.