HomeBreaking Newsचिमूरमधील अवैध वाळू तस्करी प्रकरण तापले : पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांच्यावर...

चिमूरमधील अवैध वाळू तस्करी प्रकरण तापले : पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांच्यावर चौकशी, निलंबनाचे आश्वासन

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

चंद्रपूर :

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीप्रकरणी पोलीस प्रशासनातील कथित संगनमत पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू असून, चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, तसेच चौकशी सुरू असल्याने त्यांना तात्काळ पदावरून हटवण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी १३ डिसेंबर रोजी विधानसभेत दिले.

काँग्रेसचे विधीमंडळ नेते आम.विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडत चिमूर तालुक्यातील अवैध वाळू तस्करीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. लक्षवेधीदरम्यान बोलताना त्यांनी पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले. नियमबाह्य आणि संशयास्पद पद्धतीने काम करत असल्याचा आरोप करत, रात्रीच्या गस्ती दरम्यान वाळूने भरलेला ट्रक तब्बल दहा दिवस ताब्यात ठेवण्यात आला, मात्र ट्रक मालकाशी आर्थिक देवाणघेवाण झाल्यानंतर कोणताही गुन्हा दाखल न करता तो सोडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप आम.विजय वडेट्टीवार यांनी केला.

“कायदा माझ्यासाठी नाही” अशा आवेशात संबंधित अधिकारी वागत असल्याचा आरोप करत, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात लावून धरली.

दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तात्काळ निलंबनाचे आदेश न दिल्याने संतप्त झालेल्या आम. विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेच्या मोकळ्या जागेत जाऊन जोरदार आंदोलन केले. अखेर गृहराज्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्याविरोधात चौकशी सुरू असल्याचे मान्य करत, चौकशी अहवालानंतर आवश्यक ती कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

या प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करी आणि पोलीस प्रशासनातील कथित संगनमत पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, सरकार याप्रकरणी पुढे कोणती ठोस कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments