पाणी आहे, पण शेती कोरडीच! नियोजनाअभावी कोट्यवधींचा ‘चिचडोह’ शेतकऱ्यांसाठी ठरतोय निष्प्रभ
चामोर्शी (गडचिरोली): बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर उभारलेला चिचडोह बॅरेज आज पाण्याने भरलेला असतानाही परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात मात्र कोरडवाहू चित्र दिसत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजनाअभावी निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
बॅरेज पूर्ण होऊन वर्षे लोटली, मात्र पूरक उपसा सिंचन, कालवे, वितरण व्यवस्था आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याची यंत्रणा अद्याप कागदावरच आहे. परिणामी पाणी साठवले जाते; पण शेतकऱ्यांच्या बांधावर ते पोहोचत नाही. “डोळ्यासमोर पाणी दिसतंय, पण पिकांना थेंबही नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
प्रकल्पामुळे सिंचनक्षेत्र वाढेल, पीक पद्धती बदलेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र अपूर्ण कामे, वेळकाढूपणा आणि जबाबदारीचा अभाव यामुळे लाभार्थी शेतकरी अजूनही प्रतीक्षेतच आहेत. उन्हाळ्यात पाणी उचलण्याची क्षमता असूनही वीज, पंप, पाइपलाईन आणि कालव्यांची जोडणी अपुरी असल्याने पाणी वाया जात आहे.
५७९ कोटींचा चिचडोह : पाणी भरतंय बॅरेजमध्ये, पण शेतं मात्र तहानलेलीच!
पूरक उपसा सिंचनाअभावी महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरतोय कागदी शोभा
जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरील बारमाही वैनगंगा नदीवर उभारलेला चिचडोह बॅरेज शेतकऱ्यांच्या आशेचा केंद्रबिंदू ठरावा, अशी अपेक्षा होती. मात्र कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही हा प्रकल्प प्रत्यक्षात ‘पाणी साठवा आणि पाणी सोडा’ या औपचारिकतेपुरताच मर्यादित राहिल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. पूरक उपसा सिंचन योजनांचे ठोस व वेळेत नियोजन न झाल्याने तळोधी व भेंडाळा परिसरातील हजारो हेक्टर शेती आजही पावसाच्या भरवशावर आहे.
मे २०११ मध्ये सुरू झालेल्या आणि जून २०१८ मध्ये पूर्ण झालेल्या चिचडोह बॅरेजवर नोव्हेंबर २०१९ पर्यंत तब्बल ५७९.१५ कोटी रुपये खर्च झाले. ६२.५३ दलघमी साठवण क्षमता आणि ३८ दरवाजे असलेला हा बॅरेज २० डिसेंबर २०१९ रोजी प्रथमच भरला गेला. मात्र पाण्याचा हा साठा शेतीपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपसा सिंचन योजना आजतागायत कागदावरच अडकून पडल्या आहेत.
स्थानिक शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पूरक सिंचन कामे पूर्ण करा, वेळापत्रक जाहीर करा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे. अन्यथा चिचडोह बॅरेज हा केवळ “फोटोसेशनचा प्रकल्प” ठरेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आज प्रश्न एकच—पाणी असताना शेती कोरडी का? उत्तर प्रशासनाकडे आहे; पण शेतकऱ्यांच्या हातात मात्र अजूनही रिकामीच माती.