मौजा वाघोली येथील शासकीय रेती डेपो सध्या ठेकेदारांच्या मनमानी कारभाराचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. शासकीय डेपो असतानाही येथे एकही शासकीय कर्मचारी नियमित हजर नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. परिणामी रेती उपसा, विक्री तसेच माती व मुरूम उत्खननावर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही.
ठेकेदारांच्या मर्जीप्रमाणे उत्खनन करून रेती, माती व मुरूम सर्रासपणे विक्री केली जात असून शासनाच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांच्या घरकुल व इतर बांधकामांसाठी रेती उपलब्ध नसताना, डेपोमधील रेती परगावी खुलेआम विकली जात असल्याचा आरोप आहे.
शासकीय डेपो असूनही प्रशासनाचा कुठलाही अंकुश नसल्यामुळे गैरव्यवहार बिनधास्त सुरू आहेत. संबंधित यंत्रणांनी वेळेवर दखल न घेतल्यास हा महसूल बुडीत घोटाळा आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. वाघोली रेती डेपोवर तातडीने शासकीय कर्मचारी नियुक्त करून चौकशी व कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून होत आहे.