मौजा मार्कंडा देव परिसरातील सुरू असलेल्या रस्ता व नाली बांधकामातील तांत्रिक त्रुटींवर ग्रामस्थांनी आज शांततापूर्ण आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
ग्रामस्थांनी यापूर्वीही विभागाला लेखी निवेदने देऊन कामातील विसंगती, तांत्रिक बाबी व निकृष्ट दर्जाबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही ठोस दखल न घेतल्याने ग्रामस्थ आज मोठ्या संख्येने एकत्रित आले.
“कामात तांत्रिक त्रुटी स्पष्ट दिसत असून तत्काळ चौकशी व्हावी,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
सध्या सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवून स्वतंत्र तांत्रिक समितीकडून सखोल चौकशी करावी व संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण घ्यावे, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी निवेदनातून मांडली.
या आंदोलनात माजी आमदार डॉ. देवराव होळी, ग्रामपंचायत सरपंच सौ. संगीता मोगरे, सदस्य देवराव तिवाडे, तंटामुक्ती अध्यक्ष लिलाधर मरस्कोल्हे, नामदेव महाराज नागपुरे, मुखरू शेंडे, प्रेम कोडापे, मनोज हेजीब, नितेश जुमनाके, रमेश कोडापे, संतोष सरपे, रुपम शेंडे, राकेश झाडे, सुचिता कुलसंगे, उषा कुलसंगे, उमाकांत आभारे, राजू मोगरे, सुरेश शहा, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, जयराम चलाख यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
ग्रामस्थांची ठाम भूमिका—
“कामाचा दर्जा तपासा, त्रुटी दुरुस्त करा आणि मगच बांधकामाला पुढे जाऊ द्या.”
मार्कंडा देवमधील या आंदोलनामुळे सुरु असलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर मोठा सवाल उपस्थित झाला असून आता प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.