निधीचा गैरवापर तर झालं नाही ना?असाही प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.याची चौकशी व्हावी.
चामोर्शी ::-
चामोर्शी शहरातील घोट रोडवरील जुनी तहसील कार्यालयासमोरचा प्रवासी निवारा आज अक्षरशः वटवृक्षाखालीच उभा राहिल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रवाशांना मोकळ्या आकाशाखाली, पावसात-ऊन्हात एका झाडाच्या सावलीवर अवलंबून राहावे लागत आहे. ‘प्रवासी निवारा’ या संकल्पनेची केविलवाणी अवस्था येथे पाहायला मिळते.
घोट, गडचिरोली, आष्टी, भेंडाळा, कोरेगाव आदी गावांकडे जाण्यासाठी दररोज शेकडो नागरिक या ठिकाणी बसची वाट पाहतात. मात्र बसथांबा असूनही बसण्यासाठी बाकडी नाहीत, पावसापासून संरक्षण करणारी शेड नाही, प्रकाश व्यवस्था नाही, स्वच्छतागृह तर दूरचीच गोष्ट. परिणामी वृद्ध, महिला, विद्यार्थी व रुग्ण यांची मोठी गैरसोय होत आहे.
पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात प्रखर ऊन आणि रात्री अंधार — या तिहेरी संकटांचा सामना प्रवाशांना रोज करावा लागतो. पावसात भिजत उभे राहणे, उन्हात झाडाखाली थांबणे, तर रात्री भीतीच्या सावटात बसची वाट पाहणे, हीच आजची ‘सेवा’ आहे. विशेष म्हणजे जुन्या तहसीलसारख्या शासकीय कार्यालयासमोरच ही अवस्था असणे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा तोंडी तक्रारी करूनही पालिका, तहसील प्रशासन किंवा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. साधा प्रवासी निवारा उभारणे, शेड, बाकडे, लाईट्स यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे विकासाचे प्राथमिक पाऊल असतानाही येथे उदासीनता का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
“विकासाच्या घोषणा होतात, पण प्रत्यक्षात प्रवाशांना वटवृक्षाचा आधार घ्यावा लागतो. हे चित्र लाजिरवाणे आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहे.
आता तरी प्रशासनाने जागे होऊन तातडीने सुसज्ज प्रवासी निवारा उभारावा, अन्यथा नागरिक आंदोलनाचा मार्ग पत्करण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांच्या संयमाची परीक्षा किती दिवस घेतली जाणार, हाच खरा प्रश्न आहे.