आरमोरी गडचिरोली: शिक्षक भरती (पवित्र पोर्टल) त्वरित सुरू करावी या मागणीसाठी उमेदवारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरपंच ते मुख्यमंत्री आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी ते सचिव, उपसचिव अशा लोकशाही मार्गाने पाठपुरावा करूनही *’पवित्र पोर्टल’* मार्फत अपेक्षित शिक्षक भरती सुरू न झाल्याने, उमेदवारांनी आपला लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. हा भव्य मोर्चा थेट हिवाळी अधिवेशनावर धडकेल आणि सरकारला या दिरंगाईबद्दल जाब विचारणार आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) होऊन सहा महिने उलटले आहेत, मात्र पोर्टलवर अद्याप जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नाहीत. दुसरीकडे, राज्यातील हजारो जिल्हा परिषद शाळा शिक्षकांअभावी बंद पडत असल्याची गंभीर परिस्थिती आहे.
७५ हजार शिक्षक भरती केवळ नोकरी नाही, तर तो महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया आहे. शासनाने रिक्त जागा भरण्याऐवजी राजकारण केल्याचा आरोप उमेदवार करत आहेत. युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे ‘एल्गार आंदोलन’ होणार असून, यासाठी राज्यातील सुमारे पाच हजार भावी शिक्षक उपस्थित राहणार आहेत. शिक्षक भरती प्रक्रियेत मागील काही वर्षापासून अडथळे येत असल्याने सुशिक्षित पात्रताधारकांचा रोष वाढतच चालला आहे.