चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथील वैनगंगा नदी घाट परिसरात गोवंश कत्तलीसाठी हलविले जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळताच चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी विशेष पथक तयार केले. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० ते १२.३० दरम्यान पथकाने घाट परिसरात सापळा रचून कारवाई केली.
सापळ्यात काही इसम ८ बैलांना निर्दयपणे हाकत कत्तलीसाठी नेत असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्या तस्करांना चारही बाजूंनी घेरत नियंत्रणात घेतले. या दरम्यान, पथकाने ५ पांढरे व ३ तांबूस रंगाचे असे ८ बैल ताब्यात घेऊन तब्बल १ लाख २० हजारांचा मुद्देमाल वाचवला, तर बैलांना तात्काळ जीवदान मिळाले.
या कारवाईत विलास माकोजी सुरजागडे (५५), चंदु गणपती चौधरी (५०), मारोती यादव नानगिलवार (७५), दशरथ उद्रु बारसागडे (५०) व बंडु केशव दुधबडे (४८) सर्व रा. लखमापुर बोरी यांना अटक करण्यात आली आहे. तर या तस्करी रॅकेटमधील मुख्य सहभागी गोपिचंद मनोहर चलाख (३५) हा फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहेत.
घटनाप्रसंगी उपस्थित पोलीस शिपाई भावेश वरगंटीवार यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपींवर महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(अ), ५(ब) आणि ९ अन्वये गुन्हा क्रमांक ५१२/२०२५ दाखल करण्यात आला आहे.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल नल्लावार, सहाय्यक धनंजय मेश्राम, शिपाई भावेश वरगंटीवार, विनायक मसकार यांच्या पथकाने केली. पुढील तपासाची जबाबदारी उपनिरीक्षक विशाल नल्लावार यांच्याकडे देण्यात आली आहे.