सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
चामोर्शी : चामोर्शी शहरात नव्हे तर ग्रामीण
भागामध्ये सुद्धा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत समाजामध्ये सकारात्मक संदेश देण्यासाठी चामोर्शी पोलीस नेहमीच तत्पर असतात. या सामाजिक बांधिलकीचा उत्तम प्रत्यय नुकताच आला, जेव्हा चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘धूम्रपानमुक्त पोलीस स्टेशन’ हा उपक्रम हाती घेतला.
या उपक्रमांतर्गत पोलीस निरीक्षक डोंब यांनी सर्व कर्मचाऱ्यांना धूम्रपानाचे दुष्परिणाम समजावून सांगितलेतसेच पोलीस दल हे समाजाचे आदर्श प्रतिक आहे, त्यामुळे पोलिसांनी स्वतःपासून चांगल्या सवयी जोपासणे आवश्यक आहे, असे आवाहन केले. पोलीस ठाणे परिसरात धूम्रपान पूर्णतः बंदी घालण्यात आली असून, प्रत्येक कर्मचाऱ्याने यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला आहे.
‘धूम्रपानामुळे केवळ आरोग्यच नाही, तर कर्तव्यनिष्ठेवरही परिणाम होतो. समाजासाठी आपण आदर्श ठरावा, हीच या उपक्रमामागची भावना आहे,’ असे पोलीस निरीक्षक डोंब यांनी सांगितले.
चामोर्शी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी कौतुक केले असून, या मोहिमेची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. पोलीस दलाच्या आरोग्यदायी आणि शिस्तबद्ध प्रतिमेला बळकटी देणारा हा प्रयत्न ठरत असल्याचे बोलल्या जात आहे.
सर्वसामान्यपणे पोलीस दलात नोकरी लागली की कालांतराने अनेक पोलीस खर्रा, तंबाखु, दारू आदी व्यसनाच्या आहारी जात असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही परीणाम होत असते. पोलिसांच्या व्यसनामुळे त्यांच्या कुटूंबामध्येही वाद निर्माण होत असतात. यामुळे पोलीस निरीक्षक डोंब यांच्या उपक्रमाचे स्वागत होत आहे.