दोन दिवसांत उभा राहिला ‘चमत्कारी’ रस्ता — लोक म्हणाले, “असं रोजचं व्हावं!”
सिरोचा तालुक्यातील माणिक्यपूर ते राजेश्वरपल्ली हा रस्ता गेली पाच वर्षे पासुन नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला होता. खड्ड्यांमुळे वाहनं नव्हे तर लोकच हलायचे! पण मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या राजेश्वरपल्ली येथील मेडीकल कॉलेज भूमिपूजनाच्या कार्यक्रमाने या रस्त्याचं नशीबच पालटलं.
गेल्या वर्षभरापासून नंदीगाव–राजेश्वरपल्लीचा डांबरी रस्ता पूर्णपणे उखडून गेला होता. ग्रामस्थांनी वारंवार जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे मागणी केली, पण अभियंत्यांना जणू काही तो रस्ता नकाशावरच नव्हता!
पण मुख्यमंत्री येणार हे कळताच काय झालं माहितेय? दोन दिवसांत ‘रॉयल्टी’चं भान न ठेवता मुरूमाचे डोंगर हलवून रस्ता तयार! जे पाच वर्षांत शक्य झालं नाही, ते ४८ तासांत घडलं!
लक्ष्मीपूर, नंदीगाव, माणिक्यपूर आणि राजेश्वरपल्ली या गावांतील लोकांनी डोळ्यांवर विश्वासच ठेवला नाही. “देवेंद्रजींचा दौरा असाच दर महिन्याला असावा, म्हणजे आमचं विकासाचं भाग्यही फिरावं!” असं एकाने विनोदाने सांगितलं.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या ‘चमत्काराने’ आता तिन्ही गावांतील नागरिकांना गाडी चालवताना ब्रेकपेक्षा हॉर्न जास्त वापरावा लागत नाही.