सोनू वाळके,उपसंपादक.
चामोर्शीतील MSEB चा बेजबाबदार कारभार
नागरिक त्रस्त, वेळेवर मीटर ची रीडिंग नाही वेळेवर बिल नाही. स्मार्ट मीटरच्या नावाखाली खिशावर कात्रण!
चामोर्शी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा (MSEB) चामोर्शी विभागातील कारभार पूर्णतः अनियमित झाल्याची तीव्र नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नागरिकांची मीटर रिडिंग वेळेवर घेण्यात येत नाही, तसेच विजेची बिलं उशिराने पाठवली जात असल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.
पूर्वी बिलावर मीटर रिडिंगचा फोटो असायचा, ज्यामुळे नागरिकांना बिलाची अचूकता तपासता येत होती. मात्र, आता तो फोटो देणे बंद करण्यात आले आहे, ज्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यात भर म्हणून आता ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याच्या मोहिमेखाली सामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकला जात असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
बिल वेळेवर न येणे, अचानक थकबाकी दाखवून पुरवठा खंडित करणे, ग्राहक सेवा केंद्रात प्रतिसाद न मिळणे अशा अनेक समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. “स्मार्ट मीटर” च्या नावाखाली कंपन्यांना फायदा आणि जनतेच्या खिशाला झळ — अशी नागरिकांची भावना व्यक्त होत आहे.
स्थानिक प्रशासन आणि MSEB अधिकारी यांनी यावर तातडीने लक्ष देऊन नियमित मीटर रिडिंग, बिल वितरण आणि पारदर्शक सेवा द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
स्थानिक नागरिक सांगतात की, “MSEB चे कर्मचारी वेळेवर रिडिंग घेत नाहीत. महिनाभर विलंब झाला की युनिट वाढतात आणि दरसुद्धा उच्च स्लॅबमध्ये जातो. त्यामुळे एका महिन्याचं बिल दोन महिन्यांचं लागतं.”
त्यातच आता “स्मार्ट मीटर” बसवण्याच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याने असंतोष उसळला आहे. लोकांचा आरोप आहे की, आधुनिकतेचा दिखावा करत प्रत्यक्षात नागरिकांचा आर्थिक शोषण चालू आहे.
ग्राहक सेवा केंद्रात तक्रार केली तरी प्रतिसाद मिळत नाही. “हे वीज वितरण नाही तर जनतेचा शोषण विभाग बनला आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांनी मागणी केली आहे की, MSEB ने मीटर रिडिंग वेळेवर घेऊन बिलिंग पारदर्शक करावे, आणि युनिट दरावरील अन्यायकारक वाढ थांबवावी







