प्रतिनिधी:दुर्योधन सोनुले / उपसंपादक (सोनू वाळके)
गट्टा: दिनांक 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री मोठ्या कंटेनरमध्ये निर्घृणपणे पने कोंबून आणि अवैधपणे गोवंशांची वाहतूक करताना एक भीषण अपघात घडला. गट्टया गावाच्या जवळ वाहन उलटल्याने तब्बल 16 जनावरांचा जागीच मृत्यू झाला असून, 8 जनावरे जिवंत आढळली आहेत. सदर वाहन क्रमांक TS 12 UD 0118 असून,चालक फरार आहे, ही जनावरे पेंढरी परिसरातून नेत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
हा प्रकार रात्री उशिरा घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. अपघातानंतर वाहन रस्त्याच्या कडेला फसल्याने अवैध वाहतूक उघडकीस आली. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली व संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरून गोवंशांची अवैध वाहतूक सुरू आहे. या रस्त्यावर अनेक पोलीस स्टेशन असतानाही आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत जनावरे आणि वाहन गट्टा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उप निरीक्षक योगेश तपकीरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेने पुन्हा एकदा अवैध गोवंश वाहतूक आणि त्यामागील साखळी यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.







