जात प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना घालावे लागत आहे हेलपाटे
२५० कास्ट, १५० नाॅन क्रिमीलीअर पेंडींग
गोंडपिपरीचा प्रभार राजुरा उपविभागीय अधिकारी यांचेकडे
पोंभूर्णा सुभाष घोंगडे लोकवाद :- आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या पोंभूर्णा तालुक्यातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासाठी हेलपाटे घालावे लागत आहे. विशेषतः जात प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून शौक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थांची जात प्रमाणपत्र व नाॅन क्रिमीलीअरची अनेक प्रकरणे उपविभागीय अधिकाऱ्याच्या टेबलवर पेंडींग आहे. त्यामुळे शैक्षणिक कामे वेळेत पूर्ण होत नसल्याची ओरड विद्यार्थी व पालकात आहे.
उपविभागीय अधिकारी हे महसूल विभागातील एक महत्त्वाचे पद आहे. त्यांच्या अखत्यारीत अनेक प्रशासकीय आणि न्यायिक कामे येतात,ज्यामध्ये विद्यार्थ्यांशी संबंधित कामे देखील आहेत.उपलब्ध माहितीनुसार गोंडपिपरी व पोंभूर्णा तालुक्यासाठी गोंडपिपरी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे.मात्र गोंडपिपरी येथे सध्या उपविभागीय अधिकारी रुजू झाले नसल्याने सदरचा प्रभार राजुरा उपविभागीय अधिकारी यांचेकडे देण्यात आले आहे.राजुरा उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाच तालुक्याचे काम असल्याने विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रे,नाॅन क्रिमीलीअर सारखी इतर आवश्यक कागदपत्रे मिळण्यास विलंब होत आहे.पोंभूर्णा तालुक्यातील विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्राचे २५० प्रकरणे,व नाॅन क्रिमीलीअरचे १५० प्रकरणे राजूरा येथील उपविभागीय अधिकाऱ्याच्या टेबलवर पेंडींग आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे कामे रखडली आहेत.रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी गोंडपिपरी येथे उपविभागीय अधिकारी लवकर रुजू करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. सध्या शेतीच्या कामाची लगबग तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कामे सुरू आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रांची आवश्यकता असते यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा पाल्याची दाखले तयार करण्याकरिता जावे लागते परिणामी भातपिकाची रोवण्याचा महत्वाची वेळ असतानाही लगबगीत तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून मानसिक तथा आर्थिक नुकसान होत आहे .या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी विद्यार्थ्यां व पालकांनी केली आहे.







