गडचिरोलीत चौघांच्या अपघाती मृत्यूने जिल्हा हादरला
चामोर्शी तालुक्यातील आष्टी मार्गावर घडली घटना
गडचिरोली प्रतिनिधी लोकवाद. भरधाव वेगातील ट्रकने कारला धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील आष्टी मार्गावर रविवारी (दि.18) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघाताने जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरासह चामोर्शी तालुका हादरला आहे.
विनोद पुंजाराम काटवे (45), राजेंद्र सदाशिव नैताम (45), सुनील उष्टूजी वैरागडे (55) तिघेही राहणार हनुमान वॉर्ड, गडचिरोली येथील राहणारे असून अनिल मारोती सातपुते राहणार शिवाजी चौक, चामोर्शी अशी मृतांची नावे आहेत. यातील विनोद, राजेंद्र व सुनील यांचा अपघातस्थळी मृत्यू झाला, तर अनिल यांचा गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, मृतांची कार ही चामोर्शीकडून आष्टीकडे जात होती. स्थानिक ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या काही अंतरावर चामोशीं आष्टी या महामार्गावर असलेल्या वळणावरील तलावाजवळ यूटर्न घेत असताना एका मालवाहतूक करीत असलेल्या ट्रकने कारला चामोर्शी तालुक्यातील आष्टी मार्गावरील जबर धडक दिली. त्यामुळे हा मोठा भीषण अपघात घडल्याची माहिती आहे. एमएच 33 व्ही 0825 या कारने गडचिरोली येथील विनोद, राजेंद्र व सुनील हे तिघे काही कामानिमित्त रविवारी दुपारच्या सुमारास चामोर्शीला गेले. नंतर शिवाजी चौकातून त्यांनी अनिल यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्लॅन आखला. मात्र, आष्टी मार्गाने जात असताना त्यांनी ग्रामीण रुग्णालयापासून काही अंतरावर असलेल्या वळणाजवळ परत चामोर्षी कडे वळण्यासाठी यू टर्न घेतला. नेमक्या त्याचवेळी आष्टीकडे जात असलेल्या सीजी 04 /एलडब्ल्यू- 0284 या क्रमांकांच्या मालवाहतूक ट्रकची कारला जबर धडक बसली. यात कारमधील विनोद, राजेंद्र व सुनील यांचा तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अनिल हे गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना चामोर्शी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गडचिरोली येथे हलविण्यात आले. मात्र, त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारला धडक दिल्यावर ट्रकचालकाने ट्रक घेऊन पळ काढला. मात्र, समोरील वळणावर ट्रक बंद पडल्याने ट्रकचालक व साथीदाराने ट्रक सोडून पळ काढला. या घटनेची माहिती चामोशीं पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक अमुल कादबाने, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर बनसोडे व सहकारी पोलिस कर्मचारीवर्गाने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांनी घटनास्थळाला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली, तसेच चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
मृत विनोद पुंजाराम काटवे, राजेंद्र सदाशिव नैताम, सुनील उष्टुजी वैरागडे हे तिघे गडचिरोली येथील रहिवासी असून, त्यांच्या अपघाती निधनाने हनुमान वॉर्डात शोककळा पसरली आहे. तर अनिल मारुती सातपुते यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून संपूर्ण चामोर्शी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. यांच्या निधनाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मृत विनोद काटवे यांना दोन मुले सुनील वैरागडे यांना 2 मुले, तर राजेंद्र नैताम यांना दोन मुली व अनिल मारोती सातपुते यांना एक मुलगा व एक मुलगी आहेत, यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार असून अपघाताची माहिती मिळताच गडचिरोली शहरा सह चामोर्शी तालुक्यात शोककळा पसरल्याचे दिसून आले.