सुपीक जमिनीच्या अधिग्रहणाविरोधात काँग्रेसचा इशारा; बळजबरी झाल्यास रस्त्यावर उतरू
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यात विविध उद्योग प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या सुपीक शेतजमिनींच्या अधिग्रहणाविरोधात आज शासकीय विश्राम भवन येथे पत्रकार परिषद पार पडली. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एक इंचही जमीन अधिग्रहित करू देणार नाही, असा ठाम इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला. यावेळी बोलताना काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले की, जर प्रशासन किंवा उद्योग प्रकल्पांकडून बळजबरीने जमिनी घेण्याचा प्रयत्न झाला, तर काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. या पत्रकार परिषदेला काँग्रेस विधिमंडळ गटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, आमदार रामदास मसराम, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत कोवासे, काँग्रेस नेते ॲड. राम मेश्राम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनीही या पत्रकार परिषदेला उपस्थिती दर्शवून अधिग्रहणाविरोधातील आपली भूमिका ठामपणे मांडली.