गडचिरोली :: गडचिरोली–चामोर्शी महामार्गावरील तळोधी परिसरात सायंकाळच्या सुमारास लायड मेटल कंपनीची ट्रॅव्हल्स व स्कॉर्पिओ यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे धाव घेतली. त्यांनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून जखमींवर तातडीने व योग्य उपचार करण्यात यावेत, अशी मागणी केली.
दरम्यान, जिल्ह्यात वाढत असलेल्या जड वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची गंभीर बाब पुढे येत आहे. विशेषतः सुरजागड लायड मेटल कंपनीच्या वाहनांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित कंपनीच्या सर्व जड वाहनांवर वेगमर्यादा कडकपणे लागू करावी, तसेच अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांना किमान 25 लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधी व कंपनीच्या माध्यमातून द्यावी आणि जखमींनाही योग्य आर्थिक सहाय्य करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.