गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात (NSUI) कडून मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांवर थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. बैठकीला परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये दिवाळीपूर्वी परीक्षा पार पडूनही अद्याप निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दुसऱ्या सत्राच्या परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी अधिक तीव्र होत आहे, असे यावेळी विद्यार्थ्यांनी मांडले.NSUI पदाधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. या सर्व प्रश्नांवर संघटना आक्रमक भूमिका घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा इशारा NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी दिला.यावेळी तालुकाध्यक्ष तसेच महाविद्यालयातील सर्व पदाधिकाऱ्यांना अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून NSUI ची भूमिका, कामकाज व विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.“विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही. त्यांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्यात येईल,” असा ठाम संदेश या बैठकीत देण्यात आला.