चामोर्शी : सार्वजनिक शिव-भीम जयंती उत्सव समिती, चामोर्शीच्या वतीने २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बाजार चौक येथे प्रबोधनात्मक संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. संत परंपरेतील महान विभूती आणि राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा जागर कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमात संत तुकाराम महाराज, संत रोहिदास महाराज, संत सेवालाल महाराज, संत गाडगे महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विचारांचे आत्मसात करण्याचे आवाहन प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. वैशाली डोळस (उच्च न्यायालय, संभाजीनगर) यांनी संतांच्या कार्याचा व त्यागाचा इतिहास वाचनातून जाणून घेण्याचे आवाहन केले. “आजच्या काळात शिवराय घडवायचे असतील तर प्रत्येक आईने जिजाऊ व्हावे आणि घरातील पुरुषांनी शहाजीराजे होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानासोबतच पुस्तक वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी संविधानाने दिलेल्या स्त्री-पुरुष समानतेच्या हक्कांची जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी मनोगतात महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याची गरज व्यक्त केली. “फक्त जयंती साजरी करून न थांबता त्यांच्या विचारांचे आत्मसात करून नव्या पिढीने वाचन संस्कृती जोपासली पाहिजे,” असे ते म्हणाले. मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून नगराध्यक्षा मा. जयश्रीताई वायलालवार उपस्थित होत्या. यावेळी रोशनीताई वरघटे (महिला व बालकल्याण सभापती), अमोल गं. गण्यारपवार (नगरसेवक), पी. जी. सातार (माजी गटविकास अधिकारी) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ५५ सामाजिक संघटनांचा सहभाग चामोर्शी नगरपंचायतसह तब्बल ५५ सामाजिक व जातीय संघटनांच्या सहकार्याने मागील ११ वर्षांपासून हा महोत्सव सातत्याने आयोजित केला जात आहे. नामवंत वक्ते व कीर्तनकारांच्या प्रबोधनातून सामाजिक बांधिलकी आणि सलोखा जपण्याचे कार्य या उपक्रमातून घडत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. भारती तितरे (अध्यक्षा, झाडीबोली साहित्य मंडळ शाखा चामोर्शी) यांनी केले. प्रास्ताविक कविता गो. झाडे यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी शिव-भीम जयंती महोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला चामोर्शी शहर व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.