Homeगडचिरोलीनवोदय विद्यालय घोट येथे प्राचार्यांचे दुर्लक्ष उघड — मुलांच्या मूलभूत सुविधांकडे पाठ,...

नवोदय विद्यालय घोट येथे प्राचार्यांचे दुर्लक्ष उघड — मुलांच्या मूलभूत सुविधांकडे पाठ, ऑफिससाठी मात्र एसीचा हट्ट!

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

Oplus_131072
Oplus_131072

घोट (ता.चामोर्शी) : देशभर गुणवत्तेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या नवोदय विद्यालय घोट येथे विद्यार्थ्यांच्या सुख-सुविधांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. वसतिगृह, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, पंखे-लाईट, शौचालयांची दुरवस्था अशा मूलभूत गरजांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू असताना, प्राचार्य मात्र आपल्या कार्यालयासाठी एअर कंडिशनर बसवण्याच्या मागे लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

गडचिरोली तालुक्यातील नवोदय विद्यालयाच्या ‘घोट’ येथील विद्यार्थ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. शासकीय निधी न मिळाल्यामुळे हॉस्टेल परिसरातील मॉड्युलर टॉयलेटचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना अमानवीय परिस्थितीत राहावे लागत आहे.

त्यात भर म्हणून हॉस्टेलची इमारत अत्यंत जर्जर झाली आहे. भेगा पडलेल्या भिंती, कोसळण्याच्या मार्गावर असलेली छताची स्थिती, सुरक्षिततेचा कोणताही पत्ता नाही — या सर्वांमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीच ठोस कारवाई किंवा निधी उपलब्ध झालेला नाही. “निधी अभावी विद्यार्थ्यांचे शिक्षणच नव्हे तर त्यांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे” अशी परखड प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांकडून ,स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्गखोल्या व वसतिगृहांमध्ये पुरेसे पंखे नाहीत, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची अडचण, तर शौचालयांची अवस्था दयनीय असल्याचे सांगितले जाते. आरोग्याच्या तक्रारी असूनही वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नसल्याचा आरोप पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.
याउलट, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर कानाडोळा करून प्राचार्य आपल्या कार्यालयात एसी बसवण्यासाठी आटापिटा करत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. “मुलांच्या आरोग्य व शिक्षणापेक्षा अधिकाऱ्यांच्या आरामाला प्राधान्य?” असा प्रश्न उपस्थित होत असून, हा प्रकार नवोदयच्या मूल्यांनाच तडा देणारा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
पालक व स्थानिक नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व मूलभूत सुविधा त्वरित सुधाराव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे.
नवोदयसारख्या प्रतिष्ठित संस्थेत विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा येत असेल, तर प्रशासन जागे कधी होणार? हा प्रश्न आज घोटकरांच्या मनात घोळत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments