चामोर्शी शहरात शारदा व महावीर राइस मिलमधून निघणारा काळा धूर, राख व धूळ नागरिकांच्या आरोग्यावर थेट घाला घालत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सध्या शेतकऱ्यांचे धान्य बाजारात आल्याने राइस मिलमध्ये दळणाची प्रक्रिया वाढली असून, त्यातून निर्माण होणारे प्रदूषण दिवस-रात्र परिसरात पसरत आहे.
या प्रदूषणामुळे लहान मुले, नवजात बालके, वृद्ध नागरिक, गरोदर महिला व दमा रुग्ण सर्वाधिक त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिकांना महिन्यातून वारंवार दवाखान्याची पायरी चढावी लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे. काही नागरिकांच्या घरात बसणेही कठीण झाले असून, श्वास घेणे हा देखील संघर्ष ठरत आहे.
विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वीही नागरिकांनी एकत्र येत प्रशासन व राइस मिल मालकांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यावेळी “योग्य उपाययोजना केल्या जातील” असे आश्वासन देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात एकही ठोस कारवाई झाली नाही. उलट प्रदूषणाचा त्रास दिवसेंदिवस वाढतच गेला.
शारदा राइस मिलची राख घराघरात; भांडी, कपडे, वाहनेही काळ्या थरात
शारदा राइस मिलच्या मागील वसाहतींमध्ये धूर व राखेचा अक्षरशः मारा सुरू आहे.संपूर्ण चमोर्शीत, हनुमान वॉर्ड, सोमनकर लेआऊटपासून जुन्या तहसील कार्यालय परिसरापर्यंत घरांतील भांडी, कपडे, पाणी साठवणूक भांडे, कार व दुचाकींवर काळी राख साचत आहे. नागरिकांना रोज घराची साफसफाई करावी लागत असून, दैनंदिन जीवनमान कोलमडले आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, राइस मिल व्यवस्थापनाने प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा बसवलेली नाही, नियमांची पायमल्ली सर्रास सुरू आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपंचायत व महसूल प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.
दिवस–रात्र राइस मिलकडे ये-जा करणारी अवजड वाहने मोकाट धावत असून, धूळ नियंत्रणासाठी कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. परिणामी श्वसनविकार, दमा, सततचा खोकला, डोळ्यांची जळजळ, त्वचारोग यांचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे.
पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात राइस मिल च्या धुळीची वादळे — असा “विकासाचा विडंबनात्मक चेहरा” चामोर्शीकर अनुभवत आहेत.
“मिल मालकांना फक्त नफा आणि प्रशासनाला फक्त फाईलीच दिसतात का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.”
दरम्यान, या गंभीर प्रकाराबाबत प्रदूषण विभाग, चंद्रपूर येथे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरीही प्रशासन अद्याप झोपेतच असल्याचा आरोप होत आहे.
नागरिकांचा थेट सवाल आहे—
राइस मिल मालकांवर कारवाई कधी होणार?
आरोग्यावर दुष्परिणाम झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?
वेळीच धूळ व धूर नियंत्रणाचे उपाय, कडक कारवाई आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली नाही, तर चामोर्शीतील राइस मिलचे प्रदूषण लवकरच सार्वजनिक आरोग्याच्या महाभयंकर संकटात रूपांतरित होईल, असा इशारा नागरिक देत आहेत.
नफा महत्त्वाचा की माणसाचा श्वास — याचे उत्तर प्रशासन कधी देणार??