चामोर्शी : प्रत्येक समाजात होतकरू विद्यार्थी असतातच; मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा देणारे आधारस्तंभ मिळाले तर त्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जिद्द निर्माण होऊन ते भावी समाजासाठी मैलाचे दगड ठरतात, असे मौलिक प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक विवेकानंद नरताम यांनी केले. “समाजाचे आधारस्तंभ बनाल तरच समाज प्रगत बनेल” असे सांगत त्यांनी आजच्या युवा पिढीसमोरील आव्हाने यावर प्रभावी प्रबोधन केले. ते संताजी स्नेही मंडळ, चामोर्शी यांच्या वतीने आयोजित संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव व समाज प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते.
या जयंती उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यात १५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटी, आरमोरीचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मार्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, भक्तीगीत गायक व संत चळवळीतील कार्यकर्ते संजय गोडे, मनीषाताई गडीवार व त्यांची गायक चमू उपस्थित होती.
अध्यक्षीय भाषणात भाग्यवानजी खोब्रागडे यांनी महाभारतकालीन श्रीकृष्णाचे उदाहरण देत, जसे धर्मरक्षणासाठी कृष्णाने कार्य केले तसेच आज समाजाच्या उत्थानासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तर संजय गोडे यांनी आपल्या भक्तीगीत गायनाने उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.
यावेळी इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीमधून सृष्टी कुनघाडकर, श्रावणी कुकडे, कोमल भोवरे तर बारावी विज्ञान शाखेतून विवेक कोहळे, कु. साची सोमनकर, भारत सुरजागडे आणि कला शाखेतून रितेश घोंगडे, कु. तन्वी सातपुते, लौकिक चलाख यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संताजी व यमुनामाईची रांगोळी काढणाऱ्या शेजल किशोर बुरांडे हिचाही गौरव करण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांना रविंद्रजी नैताम व बारावीच्या विद्यार्थ्यांना रवींद्र बारसागडे यांच्या वतीने रोख बक्षिसे देण्यात आली.
जयंती उत्सवाची सुरुवात शिवाजी चौक, चामोर्शी येथून संताजीच्या पालखीचे पूजन व शोभायात्रेने झाली. वारकरी संप्रदाय मुरखळा, ज्ञानेश्वरी भजन मंडळ, दत्त संप्रदाय, दुर्गा साई भजन मंडळ तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई महिला व पुरुष गायन मंच यांच्या सहभागामुळे रॅलीला धार्मिक व सामाजिक ऐक्याचे स्वरूप लाभले. संताजी नगर–मार्कंड मोहल्ला–पोलीस स्टेशन रोड–तेलंग मोहल्ला–लक्ष्मीगेट–बसस्थानक मार्गे बाजार चौकात पालखी रथयात्रेचा समारोप झाला. त्यानंतर प्रबोधन कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमाला तालुक्यातील सुमारे २००० समाजबांधव उपस्थित होते, तसेच सर्वांसाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बारसागडे, प्रास्ताविक मुकेशराव सातपुते तर आभार प्रा. प्रदीप भांडेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संताजी स्नेही मंडळ, संताजी युवा मंडळ, तेली समाज भवन पदाधिकारी व कार्यकर्ते, यमुना महिला मंडळ व समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले.