चामोर्शी, (उपसंपादक.) विसापूर गावातील अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. घरातील घबराट, पालकांची हताश धडपड आणि परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन चामोर्शी पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत मोठी शोधमोहीम उभी केली. पोलिस निरीक्षक दीपक डोंब यांनी त्वरित पथक तयार करून तळोदी नाक्यावर काटेकोर नाकाबंदी लावत दीड तास चाललेल्या थरारक ऑपरेशननंतर मुलीची सुरक्षित सुटका करत संभाव्य अनर्थ टाळला.
बि.क. १४ वर्षीय मुलगी गायब – पालक थेट पोलिस स्टेशनमध्ये धावले
बुधवारी (दि. ३) दुपारी विसापूर येथील घरातून अल्पवयीन मुलगी अचानक गायब झाली. सर्वत्र शोधाशोध करूनही मुलीचा काहीच ठावठिकाणा न लागल्याने पालकांनी थेट चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच प्रकरणाची गंभीरता ओळखून पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी यंत्रणा त्वरित ‘अॅक्शन मोड’मध्ये आणली.
सर्व रस्ते पोलिसांच्या रडारवर – तळोदी नाक्यावर कडक नाकाबंदी
चंद्रपूरकडे जाणाऱ्या मार्गांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले. चामोर्शी पोलिसांचे पथक विजेच्या वेगाने रवाना झाले. पोलिस शिपाई भावेश वरगंटीवार आणि महिला पोलिस शिपाई दुर्गम यांनी जिल्हा सीमेजवळ तळोदी नाक्यावर कडक नाकाबंदी उभारून प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू केली.
थराराला कळस – संशयास्पद वाहनातून मुलगी सापडली
तक्रार नोंदून जेमतेम दीड तास होत आला आणि तभी पोलिसांची नजर एका संशयास्पद वाहनावर खिळली. वाहनाची तपासणी केली असता आत घाबरलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलगी आढळली. पथकाने तातडीने तिला सुरक्षित बाहेर काढत पोलिस ठाण्यात आणले.
पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू – ‘ऑपरेशन फत्ते’
समुपदेशनानंतर मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. प्रत्यक्ष मुलीला पाहताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी पोलिस दलाचे मनापासून आभार मानले. या यशस्वी मोहिमेचे श्रेय पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाला आणि पोलीस निरीक्षक(PI) दीपक डोंब यांच्या नेतृत्वाला जाते. तसेच भावेश वरगंटीवार व महिला पोलिस शिपाई दुर्गम यांच्या तत्परतेने ‘ऑपरेशन तळोदी नाका’ अवघ्या दीड तासात फत्ते झाले.