चामोर्शी(भेंडाळा) : विश्वशांती कनिष्ठ विद्यालयात आनंददायी शनिवार उपक्रम आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करत विद्यार्थ्यांनी ज्ञान, संस्कार आणि सर्जनशीलतेची मेजवानी सादर केली. दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या या कार्यक्रमाला शाळेचे पर्यवेक्षक श्री. संतोष सुरावार अध्यक्ष म्हणून, तर प्रमुख अतिथी म्हणून अरुण चौधरी, गोकुळ झाडे आणि जुईली उरकूडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. समाजप्रबोधन, शिक्षणविस्तार आणि समानतेच्या मूल्यांची गरज आजही तितकीच भासते, यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनीही फुले विचार आणि समाजातील त्यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन करून उपस्थितांचे कौतुक मिळविले.
यानंतर शालेय स्तरावर भव्य विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन श्री. संतोष सुरावार यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध नवकल्पना, विज्ञानप्रकल्प, पर्यावरणपूरक मॉडेल्स आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मुलांच्या कलाकौशल्याला वाव देत विज्ञानाबद्दल उत्सुकता वाढवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन गुणवंत श्रीरामे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुमित बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. भेंडाळ्यातील हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.