ब्रम्हपुरी शहरात चालणाऱ्या अवैध देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून मोठी धडक दिली. ‘ My Health Pro spa wellness या सेंटरमध्ये आसाम, मिझोराम आणि नागालँड येथील महिलांकडून जबरदस्तीने देह व्यापार करवून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर तत्काळ कारवाई करत पोलिसांनी ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान मिझोराम व नागालँडमधील 3 महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना संरक्षणात घेऊन पुढील प्रक्रिया सुरू आहे. महिलांना रोजगाराच्या नावाखाली फसवून देह व्यापारात ढकलल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये उघड झाले आहे.
या प्रकरणात स्पा सेंटरचा व्यवस्थापक करण मोजनकार ,वय 24 वर्ष याला ताब्यात घेण्यात आले आहे, तर मुख्य मालक प्रीतिष बुरले हा घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या या कारवाईमुळे ब्रम्हपुरीमध्ये चालणाऱ्या अशा अवैध केंद्रांवर धाक बसणार असून आणखी काही ठिकाणांवरही तपास वाढविण्यात येणार आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा संशयास्पद क्रियाकलापांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.