सोनू वाळके, (उपसंपादक)
गडचिरोली:-
गडचिरोली जिल्हा कामगार कार्यालय हे भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहे. या कार्यालयात प्रत्यक्ष अधिकारी नसल्यानं, सर्व कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या मर्जीवर चालतो आणि त्यामुळे कामगार कल्याण योजनांचा संपूर्ण घोळ झाला आहे.
आम्ही अनेक वेळा कामगारांच्या प्रश्नांसाठी कार्यालयात भेट दिली, निवेदनं सादर केली, पण अधिकारी नेहमी अनुपस्थित असतात. निवेदनांवर कोणतीही कारवाई नाही, उत्तर नाही, असा बेजबाबदारपणा या कार्यालयात सातत्याने दिसतो.
प्रभारी अधिकाऱ्यांची दांडी
नागपूर येथील कामगार अधिकाऱ्याकडे गडचिरोली येथील कामगार कार्यालयाचा प्रभार आहे. त्यांना बुधवार हा दिवस नेमून दिल्याची माहिती आहे; परंतु सदर कामगार अधिकारी येथे उपस्थित राहत नाही. नागपूरवरूनच येथील कारभार हाकला जात असल्याची माहिती आहे. कामगारांची लाभाची विविध कामे अडत असल्याने नाराजी वाढत चालली आहे.
दुकाने निरीक्षकही प्रभारीच
जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात एकूण मंजूर पदांपैकी तीनच पदे भरलेली आहेत. जिल्हा कामगार अधिकारी, दुकाने निरीक्षक (गुमास्ता निरीक्षक) हे पद रिक्त आहे. ह्या दोन्ही पदांचा कारभार नागपूर येथील अधिकाऱ्यांकडे आहे. ते उंटावरून शेळ्या हाकल्यागत येथील कारभार करतात. त्यामुळे कामगारांची लूट होत आहे.
राज बन्सोड,जिल्हाध्यक्ष, आझाद समाज पार्टी.
गोरगरीब कामगारांना लाभनाकारून बोगस नावांची नोंदणी करून लाखो रुपयांचा गैरवापर कामगार अधिकाररी कार्यालयामार्फत केला जात आहे. काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने दलाल कामगार कल्याण निधी लुटत आहेत. येथील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करून संबंधित अधिकारी व दलालांवर गुन्हे दाखल करावेत.
आज जिल्हा कामगार कार्यालयात दलालांचा उघड सुळसुळाट झाला आहे. योजना मंजूर करून घेण्यासाठी आणि साहित्य वाटपात रोख पैशांची उघड देवाणघेवाण सुरू आहे. आम्ही स्वतः या प्रकाराची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना आधीच दिली होती, पण त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
गोर-गरिब, प्रत्यक्ष कामगार यांना लाभ नाकारून बोगस नावांनी लाखो रुपयांचा गैरवापर केला जात आहे. काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने दलाल मंडळी कामगार कल्याण निधी लुटत आहेत.
आजाद समाज पार्टी या सर्व भ्रष्टाचाराचा तीव्र निषेध करते आणि ताबडतोब चौकशी समिती स्थापन करून संबंधित अधिकारी व दलालांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करते.
जर पुढील काही दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर आम्ही जिल्हा कामगार कार्यालयावर आंदोलन उभारू आणि लोकांना रस्त्यावर उतरवू.
कामगारांचा हक्क लुटणाऱ्यांना आता माफ केले जाणार नाही.







