सोनू वाळके,उपसंपादक.
गडचिरोली:-
तालुक्यात ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गण आहेत. ७५ ग्रामपंचायती असलेला चामोर्शी हा जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मोर्चेबांधणी व राजकीय हालचालींना वेग आला आहे. गावोगावी, चौकाचौकात आणि सोशल मीडियावर भावी आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उमेदवारांची चळवळ सुरू झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
निवडणुकीची अधिकृत घोषणा व्हायची बाकी असली तरी इच्छुक उमेदवार मात्र आपापल्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचू लागले आहेत. ग्रामीण भागांमध्ये चामोर्शी शहर वगळता या होणाऱ्या निवडणुका अतिशय चुरशीच्या व एकमेकांच्या विरोधात होण्याचे दाट चिन्ह सध्याच्या वातावरणात दिसत आहे. गावात कुठे दिवाळीच्या शुभेच्छा, कुठे भाऊबीज, काही ठिकाणी तर दररोज वेगवेगळ्या मित्रमंडळांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्या भेटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करून नागरिकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. विकास आमचा ध्यास किंवा आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर अशा आकर्षक घोषवाक्यांनी सजलेले फ्लेक्स आणि रील्स सध्या फेसबुक, व्हॉट्सप यावर दिसून येत आहेत.
काही दिवसात स्पर्धा चुरशीची होणार :
पुढील काही दिवसांत निवडणुकीचे औपचारिक वेळापत्रक जाहीर होईल. मात्र, सध्याच तालुक्यातील राजकीय वातावरण उत्साह, चर्चा आणि अपेक्षांनी गजबजलेले आहे. चहाच्या टपरीवर गावागावात यावेळी कोणाची लाट येणार याची एकच चर्चा रंगली आहे.त्यामुळे आतापासूनच राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र गावागावात पहावयास मिळत आहे.ग्रामीण मतदारांचा मूड बघण्यासाठी बरेचसे स्वघोषित
उमेदवार शेतकऱ्यांच्या पांदण स्त्यांवर पोहोचत आहेत. आगामी दिवसांत हे राजकीय चित्र आणखी रंगेल आणि स्पर्धा चुरशीची होईल, हे मात्र निश्चित. तालुक्यातील काही सर्कल महिलांकरिता राखीव असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ आणखी वाढली आहे. –
ग्रामीण मतदारांचा मूड
जि.प. गट व पं.स. गणाचे आरक्षण तालुक्यातील ९ जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये कुनघाडा रै. तळोधी (मो.), विसापूर १. कुरुळ (सर्वसाधारण महिला), विक्रमपुर-फराडा (नामाप्र महिला), भेंडाळा-मुरखळा, लखमापूर बोरी-गणपूर (नामाप्र), हळदवाही-रेगडी, आष्टी-इल्लूर (सर्वसाधारण), घोट सुभाषग्राम, दुर्गापूर-वायगाव (सर्वसाधारण महिला) आरक्षण जाहीर झाले आहे. तर पंचायत समितीच्या १८ गणासाठी कुनघाडा रै, गणपूर रै. (नामाप्र), तळोधी, विसापूर रै., दुर्गापूर, घोट, सुभाषग्राम (सर्वसाधारण), कुरूळ, फराडा, विक्रमपूर, भेंडाळा (सर्वसाधारण महिला), मुरखळा (माल), लखमापूर बोरी (नामाप्र महिला), वायगाव, हळदवाही (एसटी महिला), रेगडी (अनुसूचित जमाती), आष्टी (एससी महिला), इल्लूर (एससी) असे आरक्षण जाहीर झाले आहे.







