गटविकास अधिकारी मा. आंधळे यांची गट्टा विद्यालयाला भेट
विद्यार्थी व शिक्षकवर्गाच्या कार्याचे कौतुक
गडचिरोली प्रतिनिधी लोकवाद : नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय, गट्टा येथे गटविकास अधिकारी श्री. आंधळे यांनी नुकतीच भेट देऊन शाळेची पाहणी केली. या वेळी त्यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थी संख्या, शिस्त, स्वच्छता व इतर उपक्रमांचा आढावा घेतला.
गटशिक्षण अधिकारी मान.आंधळे यांनी शाळेतील शिक्षकवर्गाचे विशेष कौतुक केले. “अडचणीच्या परिस्थितीतही आपण मुलांना चांगले शिक्षण देत आहात. ही गोष्ट खरोखरच प्रेरणादायी आहे,” असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करण्याचे व आयुष्यात मोठे ध्येय ठेवण्याचे आवाहन केले. “शिक्षण हेच तुमच्या भविष्याची खरी किल्ली आहे. शिस्त आणि मेहनत या दोन गोष्टी अंगीकारल्यास यश नक्की मिळेल,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.
शाळेतील स्वच्छता व शिस्तबद्ध वातावरण पाहून श्री. आंधळे यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी विद्यालय व्यवस्थापनाला पुढील काळात आणखी चांगले उपक्रम राबविण्याचे सुचविले.
या वेळी विद्यालयाचे शिक्षक, व्यवस्थापन समितीचे सदस्य,पंचायत समितीचे अधिकारी वर्ग,तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. गटविकास अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे विद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक व विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा मिळाली आहे.







