गडचिरोली :: चामोर्शी येथे अगरबत्ती प्रकल्प सुरू करून रोजगार देण्याचे आमिष दाखवत भाजपच्या एका नगरसेवकाने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप करत काही महिला गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उपोषणास बसल्या आहेत. या उपोषणकर्त्या महिलांच्या मंडपाला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भेट देऊन महिलांशी संवाद साधला.
सदर प्रकरणात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) मधील नगरसेवकाचा थेट नामोल्लेख असल्याने तसेच सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे प्रशासनाने या उपोषणाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे काही महिलांची प्रकृती खालावून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही ‘देवा भाऊंच्या लाडक्या बहिणीं’वर त्यांच्या पक्षातीलच एका नगरसेवकामुळे उपोषण करण्याची वेळ येणे ही गंभीर बाब असल्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले. मात्र, या संपूर्ण प्रकरणाकडे मुख्यमंत्री तसेच प्रशासनाने अद्यापही दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
सदर प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित उपोषणकर्त्या महिलांवर झालेला अन्याय तत्काळ दूर करावा, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी केली.