चामोर्शी तालुक्यातील इल्लूर येथील बिल्ड आष्टी पेपर मिलच्या तब्बल 292.5 एकर जमिनीची विक्री करून सुमारे 400 कामगारांना बेरोजगारी व उपासमारीच्या संकटात लोटल्याच्या निषेधार्थ 24 फेब्रुवारी 2026 पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देत जाहीर पाठिंबा दर्शविला.
बिल्ड आष्टी पेपर मिलची जमीन परस्पर त्रिवेणी लाईड्स मेटस या कंपनीला विकण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता ही जमीन विक्री करण्यात आल्याने कामगारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. कामगारांच्या म्हणण्यानुसार, मागील चार ते पाच वर्षांत मिलमधील परिस्थिती जाणीवपूर्वक ढासळविण्यात आली. मिलचे काम टप्प्याटप्प्याने बल्लारशाह येथे हलवून अखेर 1991 पासून सुरू असलेल्या उत्पादन प्रक्रियेवर पूर्णविराम देण्याचा डाव आखण्यात आल्याची तीव्र शंका व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या पेपर मिल संकुलात नव्या समूहाकडून स्वच्छता, गुरव दुरुस्ती व इतर कामे सुरू असून, यामागे प्लांट पूर्णपणे बंद करण्याचा कट असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे.
कामगारांच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत — • तृतीय पक्षासाठी जमीन विक्री न करता ती उद्योगासाठीच राखीव ठेवावी • विद्यमान पायाभूत सुविधा जतन करून प्लांट तात्काळ सुरू करावा • सुमारे 400 कामगारांचे रोजगार कायमस्वरूपी सुरक्षित करावेत
उपोषणस्थळी कामगार युनियनचे सचिव विधानचंद्र बॅनर्जी यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, “निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले कामगार इतरत्र स्थलांतरास तयार नाहीत. आम्ही इथून कुठेही जाणार नाही.”
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे प्रमोद भगत, पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ स्पुलवार, दिवाकर मिसार, लालाजी सातपुते, चामोर्शी सोशल मीडिया प्रमुख विजय लाड, सामाजिक कार्यकर्ते विनय येलमुले, सुभाष कोठारे तसेच एन.एस.यु.आय. जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगारांच्या प्रश्नावर शासन व व्यवस्थापनाने तात्काळ योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.