सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.



कोनसरी (प्रतिनिधी):
जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादन प्रक्रियेला स्थगिती दिलेली असतानाही लॉयड मेटल कंपनीच्या अधिकाऱ्यांची मुजोरी थांबलेली नसल्याचे धक्कादायक चित्र कोनसरी येथे समोर आले आहे. संजय उमाजी गुरनुले यांच्या शेतीतून कंपनीकडून जबरदस्तीने जमीन सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
सदर १०० हेक्टर जमीन यापूर्वीपासून वादग्रस्त असून, या जमिनीबाबत खोटे ठराव नोटरी करून कंपनीला देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याविरोधात शेतकऱ्यांनी मोठा उठाव करत प्रशासनाकडे धाव घेतली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादनाला स्थगिती आदेश दिले होते.
मात्र, आदेशाला केराची टोपली दाखवत कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा शेतीमधून ट्रकसाठी रस्ता काढण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांची परवानगी न घेता यंत्रसामग्री घालून जमीन सपाट करण्याचे प्रकार सुरू असल्याने संताप अधिकच वाढला आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे काही पोलिस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शेतमालकांना धमकावणे, धारेवर धरणे आणि विरोध केल्यास कारवाईची भीती दाखवणे असे प्रकार सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
“स्थगिती असतानाही कंपनीची मनमानी सुरू आहे. आमच्या शेतीत घुसखोरी थांबली नाही तर तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.







