HomeBreaking Newsचामोर्शी–हरणघाट मार्गावर धुराचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्यावर घातक आघात, प्रशासन गाढ झोपेत!

चामोर्शी–हरणघाट मार्गावर धुराचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्यावर घातक आघात, प्रशासन गाढ झोपेत!

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी/गडचिरोली

चामोर्शी–हरणघाट हा महत्त्वाचा दळणवळण मार्ग आज अक्षरशः धूर, धूळ आणि दुर्लक्ष यांचा बळी ठरत आहे. रस्त्याची दयनीय अवस्था, उखडलेला डांबर, खड्डे आणि सततची अवजड वाहतूक यामुळे हवेत प्रचंड प्रमाणात धूळ-धूर उडत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे पाहण्यासाठी प्रशासनाकडे ना वेळ आहे, ना इच्छाशक्ती.

या मार्गावरून जाणारे वाहनांचे ताफे क्षणार्धात धुराचे लोट निर्माण करतात. परिणामी लहान मुले, वृद्ध, महिला तसेच श्वसनविकार असलेले रुग्ण यांना खोकला, दमा, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी व त्वचारोगांचा त्रास वाढला आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि रोज प्रवास करणारे कामगार अक्षरशः जीव मुठीत घेऊन ये-जा करत आहेत.

स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर प्रशासन केवळ आश्वासनांची पोकळ भाषा करत आहे. रस्ता दुरुस्ती, पाणी मारून धूळ नियंत्रण, वेगमर्यादा फलक, अवजड वाहनांवर नियंत्रण यांसारख्या तातडीच्या उपाययोजना कागदावरच अडकून पडल्या आहेत. विकासाच्या नावाने फक्त फाईली फिरत आहेत, प्रत्यक्षात मात्र नागरिकांचा श्वास कोंडला जात आहे.

प्रश्न साधा आहे—कोणाची वाट पाहत आहे प्रशासन? एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच जाग येणार का? चामोर्शी–हरणघाट मार्गावरील धूर प्रदूषण हा केवळ असुविधेचा नाही तर थेट सार्वजनिक आरोग्याचा गंभीर मुद्दा आहे. तात्काळ रस्त्याची दुरुस्ती, कायमस्वरूपी डांबरीकरण व प्रदूषण नियंत्रणाची ठोस उपाययोजना न झाल्यास प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जनआक्रोश उफाळून येईल, हे निश्चित.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments