गडचिरोली जिल्ह्यात माणुसकी हरपली दिसत आहे ,लोकांची फक्त बघ्याची भूमिका.
गडचिरोली, दि. 10 : शहरातील चंद्रपूर मार्गावर आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात कार्मेल स्कूलच्या महिला शिक्षिका ममता बांबोळे (रा. पोर्ला, सध्या कॉम्प्लेक्स) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बी फॅशन प्लाझा समोर मालवाहू ट्रक रिव्हर्स घेत असताना दुचाकीचा तोल सुटल्याने त्या खाली कोसळल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांनी मदतीसाठी तळमळ केली, परंतु घटनास्थळी उभ्या असलेल्या अनेकांनी मदतीचा हात पुढे न केल्याचे दृश्य कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अतिक्रमण, पार्किंगची उघडीपणे चाललेली दादागिरी — प्रशासन मात्र मुकं या मुख्य मार्गावर अतिक्रमणाचा प्रश्न परत ऐरणीवर आला आहे. अनेक दुकानांनी फुटपाथ गिळंकृत करून वस्तू थेट रस्त्यावर ठेवणे, दुकानासमोर पार्किंगची कोणतीही सुविधा नसल्याने वाहनधारकांची रस्त्यातील उभी केली जाणारी वाहने यामुळे मार्ग धोकादायक बनला आहे. सकाळ-संध्याकाळ वाहनांची प्रचंड गर्दी असताना वाहतूक नियमनाचा पूर्णत: बोजवारा उडाल्याने हा अपघात टाळता आला असता, असा नागरिकांचा आरोप आहे.
आजही या परिस्थितीत, रिव्हर्स घेत असलेल्या ट्रकला वळण्यासाठी पुरेशी जागा न मिळाल्याने दुचाकी स्लिप होऊन बांबोळे यांचा जीव गेला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली आणि वाहतूक काही वेळ ठप्प राहिली. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत, “ही रोजचीच वेळ, अतिक्रमण आणि पार्किंगच्या गोंधळामुळे मुख्य मार्ग जीवघेणा बनला आहे, आणि प्रशासन तरीही जागं होत नाही,” असा कडवा सूर लावला.
ट्रक चालकास अटक करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे. परंतु नागरिकांचा सवाल कायम — “प्रशासनाने वेळेवर अतिक्रमण हटवले असते, पार्किंगचे नियोजन केले असते, तर हा बळी गेला असता का?”
मुख्य मार्गाच्या सुरक्षेबाबत प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.