स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय गडचिरोली येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्काऊट-गाईड कार्यकारी समितीची महत्त्वपूर्ण सभा पार पडली. या बैठकीत येत्या जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळावा,कब बुलबुल उत्सव तसेच विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन ठरविण्यात आले. बैठकीदरम्यान माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्काऊट-गाईड उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, निसर्गप्रेम तसेच सामाजिक बांधिलकी तयार होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. जिल्हा स्काऊट-गाईड कार्यालयामार्फत दरवर्षी विविध उपक्रम, प्रात्यक्षिके, सांस्कृतिक सादरीकरणे, सामाजिक उपक्रम व प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार असल्याचे समितीने नमूद केले. आगामी मेळाव्याचे नियोजन, कार्यपद्धती, शिबिराचे ठिकाण, सुरक्षा, स्वयंसेवकांची नियुक्ती, स्पर्धांचे आयोजन यासह सर्व बाबींबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत झाली. लवकरच अधिकृत परिपत्रकाद्वारे सर्व शाळांना सूचना पाठविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. यात एटापल्ली येथे स्काऊट गाईड जिल्हा मेळावा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात, एक दिवशी कबबुलबुल उत्सव कुरखेडा व शिक्षकाचे प्रशिक्षण गडचिरोली येथे घेण्यात येईल असे ठरविण्यात आले.यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, उपशिक्षणाधिकारी अमरसिंग गेडाम, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट कालिदास बन्सोड, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड कांचन देशमुखे, जिल्हा संघटक स्काऊट विवेक कहाळे, जिल्हा संघटक गाईड नीता आगलावे,सहाय्यक आयुक्त स्मिता लडके ,प्राचार्य विधान बेपारी, माजी जिल्हा चिटणीस अजय लोंढे , कार्यालयीन कर्मचारी लिपिक पियुश नंदनवार,श्रिकृष्ण ठाकरे उपस्थित होते.