🔴 NMMS परीक्षेत नंदिनी देऊलवारची उत्तुंग भरारी; NT-C प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम
मूल प्रतिनिधी लोकवाद; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत मूल तालुक्यातील विवेकानंद विद्यालय, बेंबाळ येथील विद्यार्थिनी नंदिनी शंकर देऊलवार हिने उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचा मान उंचावला आहे.
नंदिनीने चंद्रपूर जिल्ह्यातून जनरल प्रवर्गात पाचवे मेरिट स्थान पटकावले असून NT-C प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. ती मूळची जुनासुर्ला येथील रहिवासी असून इयत्ता आठवीत असताना तिने ही परीक्षा दिली होती.
एकूण १८० गुणांच्या या परीक्षेत नंदिनीने १२४ गुण मिळवून गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले. या यशामुळे तिला आता इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत पुढील चार वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत राहून, गरिबीचे चटके सहन करत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर नंदिनीने हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
शाळेचे मुख्याध्यापक के.सी. कामडी, शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांनी नंदिनी, तिचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षक नागेश संदमेनवार यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
या यशामुळे विवेकानंद विद्यालय, बेंबाळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.






