🔴 गडचिरोली नगर परिषदेच्या पुढाकारातून गडचिरोलीकरांना दिलासा; अंत्यसंस्कारासाठी चिता लाकूड मोफत
अध्यक्ष प्रणितीताई निंबाळकर (भांडेकर) यांचा पुढाकार
गडचिरोली प्रतिनिधी लोकवाद : शहरातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक व लोकहिताचा निर्णय गडचिरोली नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. नगराध्यक्ष निंबाळकर (भांडेकर) यांच्या पुढाकारातून कटानी नदी परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लागणारे चिता लाकूड आता पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांवर अचानक येणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, विशेषतः गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. अनेकदा अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडाचा खर्च मोठा असल्याने कुटुंबियांना अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष निंबाळकर (भांडेकर) यांनी सभेत हा विषय प्राधान्याने मांडला.
नगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व नगरसेवकांनी या निर्णयाचे समर्थन करत एकमताने ठराव मंजूर केला. त्यामुळे हा निर्णय केवळ प्रशासनाचा नव्हे, तर संपूर्ण नगरपरिषदेच्या सामूहिक संवेदनशीलतेचे प्रतीक मानला जात आहे.
या उपक्रमामुळे कटानी नदी परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणाऱ्या नागरिकांना आता चिता लाकूड मोफत मिळणार असून, याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे. तसेच या सुविधेचा लाभ सर्वांना समानपणे मिळावा यासाठी योग्य नियोजन व देखरेख करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
शहरातील नागरिकांनी या निर्णयाचे मनापासून स्वागत केले असून, नगरपालिकेच्या या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अनेकांनी हा निर्णय “खऱ्या अर्थाने लोकाभिमुख व संवेदनशील प्रशासनाचे उदाहरण” असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.







