गडचिरोली |प्रतिनिधी मुख्यमंत्री महोदयांच्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान “मॉक ड्रिलच्या ” नावाखाली शहरातील चारही दिशांची वाहतूक तब्बल ३० ते ४० मिनिटे पूर्णपणे ठप्प ठेवण्यात आली. या बेजबाबदार नियोजनामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे रुग्णवाहिका सुद्धा अडवण्यात आल्याचे प्रकार घडले, ही बाब अत्यंत गंभीर असून मानवी जीवनाशी थेट खेळ करणारी आहे. या प्रकाराचा आजाद समाज पार्टीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून प्रशासन व सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या ‘व्हीव्हीआयपी(VVIP) ट्रीटमेंट’ वर कडाडून टीका केली आहे.
यावेळी प्रतिक्रिया देताना आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम म्हणाले की,“जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी व मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी जर जनतेलाच गैरसोयीला सामोरे जावे लागत असेल, तर अशा सत्तेचा आणि व्यवस्थेचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या एका दौऱ्यावर सुरक्षा व वाहतूक नियंत्रणाच्या नावाखाली जो कोट्यवधींचा खर्च केला जातो, तोच खर्च जर रस्ते सुरक्षा, ट्राफिक व्यवस्थापन व नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर केला, तर गडचिरोली जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल आणि हजारो लोकांचे प्राण वाचू शकतील.” ते पुढे म्हणाले की,“जनतेला वेठीस धरणारी व्हीव्हीआयपी संस्कृती सोडून देणे ही काळाची गरज आहे. जनतेसाठी काम करणारे सरकारच खऱ्या अर्थाने लोकशाही सरकार म्हणवून घेण्यास पात्र ठरेल.”
आजाद समाज पार्टीने स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, ‘यापुढे मुख्यमंत्री अथवा कोणत्याही मंत्र्यांच्या दौऱ्याच्या नावाखाली नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचवणारी, वाहतूक ठप्प करणारी व रुग्णवाहिकांना अडवणारी व्यवस्था आढळून आल्यास आजाद समाज पार्टी तीव्र आंदोलन छेडेल व त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.’ जनतेच्या सोयीसाठी दौरे नियोजनबद्ध, संवेदनशील व पारदर्शक पद्धतीने राबवावेत, अशी ठाम मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे.