SONU WALKE, DEPUTY EDITOR, LOKWAD NEWS.
नियम धाब्यावर बसवून गांधी पेट्रोल पंपावर सऱ्यास काळा बाजार
चामोर्शी/गडचिरोली:- मूल रोडवरील गांधी पेट्रोल पंपावर स्थानिक ग्राहक रांगेत ताटकळत असताना हजारो लिटर पेट्रोल मोठ्या कंटेनरमध्ये भरून दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विक्री नियमांनुसार होत आहे का, तसेच आवश्यक परवानग्या आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.”
चामोर्शी | प्रतिनिधी
चामोर्शी-मूल रोडवरील एका पेट्रोल पंपावर स्थानिक ग्राहकांना दीर्घकाळ रांगेत थांबवून बाहेरील मोठ्या प्रमाणातील पेट्रोल खरेदीदारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नियमित ग्राहक असूनही त्यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते, तर काही बाहेरील व्यापाऱ्यांना मोठ्या डबक्यात पेट्रोल भरून दिले जाते. संबंधित ग्राहकांनी याबाबत विचारणा केल्यास कर्मचाऱ्यांकडून किंवा व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
पेट्रोलियम क्षेत्रातील सुरक्षा नियमांनुसार इंधनाची साठवणूक व वाहतूक करताना निश्चित सुरक्षा मानके आणि अधिकृत परवानग्या आवश्यक असतात. मोठ्या प्रमाणात डब्यांमध्ये इंधन विक्री केली जात असल्यास संबंधित यंत्रणांनी त्याची तपासणी करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, जर मोठ्या प्रमाणात इंधनाची विक्री केली जात असेल तर त्या व्यवहारांची वैधता, परवानग्या आणि सुरक्षा नियमांचे पालन याबाबत प्रशासनाने चौकशी करावी. तसेच स्थानिक ग्राहकांना दुय्यम वागणूक मिळत असल्याच्या तक्रारींचीही दखल घ्यावी.
या प्रकरणाची जिल्हा पुरवठा विभाग, तेल कंपनीचे अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी चामोर्शीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.