HomeBreaking NewsCoinflog च्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक? गडचिरोली-चामोर्शीत गुंतवणूकदार हवालदिल; जबाबदारांवर कारवाईची मागणी.

Coinflog च्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक? गडचिरोली-चामोर्शीत गुंतवणूकदार हवालदिल; जबाबदारांवर कारवाईची मागणी.

SONU WALKE, DEPUTY EDITOR, LOKWAD NEWS.

“Coinflog प्रकरणात सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे फसवणूक झालेल्या अनेक नागरिकांनी पैसे परत मिळणार नाहीत या भीतीने तक्रारच केली नाही. गावोगावी जाऊन गुंतवणूक गोळा करणारे आज हात वर करत आहेत, ‘आम्हाला अटक करा, आमच्याकडे पैसे नाहीत’ असे सांगत आहेत. मात्र ज्यांनी नागरिकांच्या पैशांची हमी घेतली, त्यांनीच कंपनीच्या नावाने तक्रार दाखल करून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणात आर्थिक आणि मानसिक मृत्यू मात्र सामान्य गुंतवणूकदारांचाच झाला आहे.”

चामोर्शी प्रतिनिधी :

गडचिरोली जिल्ह्यासह चामोर्शी तालुक्यात Coinflog नावाच्या कथित गुंतवणूक योजनेतून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप पुढे येत असून, अनेक कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. “गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट परतावा मिळेल” या आमिषाला बळी पडून हजारो नागरिकांनी आपली आयुष्यभराची बचत या योजनेत गुंतवली होती. मात्र कंपनी बंद झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकले असून वर्ष उलटूनही त्यांना एक रुपयाही परत मिळालेला नसल्याची तक्रार आहे.

माहितीनुसार, गावोगावी काही प्रभावशाली व्यक्तींनी स्वतःची जबाबदारी असल्याचे सांगत नागरिकांकडून हजारो ते लाखो रुपयांची रक्कम जमा करून घेतली. जलद आणि तिप्पट परताव्याचे आश्वासन देत मध्यमवर्गीय, शेतकरी, मजूर आणि गरीब कुटुंबांना या योजनेत सहभागी करण्यात आले. अनेकांनी कर्ज काढून, तर काहींनी शेतीमाल विकून किंवा दागिने गहाण ठेवून गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, मोठ्या रकमेच्या व्यवहारांमध्ये काही गुंतवणूकदारांना सुरक्षा म्हणून कोरे धनादेश (ब्लँक चेक) देण्यात आले, तर काहींच्या नावावर प्लॉट किंवा मालमत्ता लिहून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला. मात्र काही काळ परतावा मिळाल्यानंतर अचानक व्यवहार बंद पडले आणि कंपनीचे कामकाज ठप्प झाले.

यामुळे अनेक गुंतवणूकदार आर्थिक संकटात सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले त्यांनी नंतर हात वर करत “आम्ही पैसे देऊ शकत नाही, आम्हाला जेलमध्ये टाका पण पैसे नाहीत” अशी भूमिका घेतल्याचा आरोप संतप्त गुंतवणूकदारांनी केला आहे.

स्थानिक पातळीवर या फसवणुकीची चर्चा जोरात असून, संपूर्ण जिल्ह्यातील फसवणुकीचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र भीती, सामाजिक संबंध आणि पैसे परत मिळण्याच्या आशेमुळे अनेक पीडित नागरिक अद्याप पुढे येण्यास तयार नसल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, गुंतवणूकदारांची यादी जाहीर करावी आणि अडकलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी विशेष यंत्रणा नियुक्त करावी, अशी मागणी पीडितांकडून होत आहे.

“तिप्पट परताव्याच्या मोहात हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली; आता प्रशासन आणि पोलीस यंत्रणा नेमकी कोणती भूमिका घेणार?” हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments