HomeBreaking Newsमार्कंडा देव येथे MSRDC च्या कामांचा बोजवारा? भाविक वाहतूक ठप्प; कंत्राटदारावर कारवाईची...

मार्कंडा देव येथे MSRDC च्या कामांचा बोजवारा? भाविक वाहतूक ठप्प; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

SONU WALKE, DEPUTY EDITOR,LOKWAD NEWS.

◆◆ ग्रामपंचायत मार्कंडा देव यांची कंत्राटदार (MSRDC) जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल.

◆◆ रस्ते कामासाठी अवैध बिना रॉयल्टी ची रेतीचा वापर  तहसीलदार काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष.@@

 

चामोर्शी प्रतिनिधी : विदर्भातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या मार्कंडा देव परिसरात MSRDC अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते व बांधकाम कामांबाबत नागरिक आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निकृष्ट दर्जाचे काम, नियोजनाचा अभाव आणि मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या कामांमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

भाविकांची मोठी गर्दी असलेल्या या ठिकाणी रस्त्यावरील कामे सुरू असताना कोणतेही प्रभावी वाहतूक नियोजन करण्यात आले नसल्याने भर रस्त्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. परिणामी भाविक, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः सुट्टीच्या दिवशी आणि धार्मिक कार्यक्रमांच्या काळात परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कामाच्या दर्जाबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित कंत्राटदाराकडून दखल घेतली जात नाही. उलट प्रशासनाचे आणि काही लोकप्रतिनिधींचे पाठबळ असल्याच्या जोरावर मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

काही नागरिकांनी तर संबंधित कंत्राटदार जिल्हाधिकाऱ्यांचे नाव घेऊन दबाव निर्माण करत असल्याचाही गंभीर आरोप केला आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, निकृष्ट दर्जाचे काम, वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक गैरसोयीबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर तसेच संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

मार्कंडा देवसारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाच्या स्थळी विकासकामांच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबवून कामांचा दर्जा, पारदर्शकता आणि योग्य नियोजन सुनिश्चित करावे, अशी अपेक्षा भाविक आणि स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

“विकासाच्या नावाखाली जनतेला त्रास देणाऱ्यांवर कारवाई होणार का, की भाविकांची फरफट अशीच सुरू राहणार?” हा प्रश्न आता परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments