Homeगडचिरोलीनगरपंचायत चामोर्शी येथील नगरसेवकांच्या 5 वर्षाच्या कामगिरीचे सार्वजनिक मूल्यांकन करण्याची वेळ; नागरिकांमध्ये...

नगरपंचायत चामोर्शी येथील नगरसेवकांच्या 5 वर्षाच्या कामगिरीचे सार्वजनिक मूल्यांकन करण्याची वेळ; नागरिकांमध्ये चर्चा.

SONU WALKE, DEPUTY EDITOR, LOKWAD NEWS.

आता वेळ आली नगरसेवकांची 5 वर्षाचा हिशोब द्यायची आणि घेण्याची वेळ.

 

चामोर्शी : लोकशाहीमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी मोठमोठी आश्वासने देणाऱ्या चामोर्शी नगरपंचायतीतील 17 प्रभागांच्या 17 नगरसेवकांनी आता आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाचा सार्वजनिक हिशोब जनतेसमोर मांडण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या पाच वर्षांत प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागासाठी किती निधी मंजूर करून आणला, किती निधी खर्च झाला, कोणती विकासकामे पूर्ण झाली, कोणती कामे रखडली, किती रस्ते बांधले गेले, किती नाल्यांचे काम झाले, पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी कोणते ठोस प्रयत्न करण्यात आले याची माहिती नागरिकांना मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.

फक्त निवडणुकीच्या तोंडावर मतदारांच्या दारात जाऊन आश्वासनांची खैरात वाटण्यापेक्षा नगरसेवकांनी आपल्या कार्याचा लेखाजोखा जाहीर करावा. प्रत्येक प्रभागात सार्वजनिक सभा घेऊन कामांची यादी, मंजूर निधी, खर्चाचा तपशील आणि भविष्यातील विकास आराखडा जनतेसमोर मांडावा. कारण विकासाच्या नावाखाली नेमके काय झाले आणि काय झाले नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार मतदारांनाच आहे.

राजकीय पक्ष, गटबाजी आणि वैयक्तिक संबंध बाजूला ठेवून नागरिकांनीही आता जागरूक होण्याची गरज आहे. “आपल्या प्रभागासाठी नगरसेवकाने नेमके काय केले?” हा प्रश्न प्रत्येक मतदाराने विचारला पाहिजे. केवळ प्रचारातील गाजावाजा, बॅनरबाजी किंवा आश्वासनांवर विश्वास ठेवण्याऐवजी कामगिरीच्या आधारे लोकप्रतिनिधींचे मूल्यमापन करणे ही काळाची गरज बनली आहे.

चामोर्शीतील जनतेने आता विकासाच्या दाव्यांची पडताळणी करूनच पुढील निवडणुकीत मताचा अधिकार वापरावा. कारण पाच वर्षे जनतेच्या विश्वासावर सत्ता उपभोगणाऱ्या नगरसेवकांना पुन्हा संधी द्यायची की नाही, याचा निर्णय त्यांच्या प्रत्यक्ष कामगिरीवरच ठरणार आहे.

“मत मागण्यापूर्वी कामाचा हिशोब द्या; मगच जनतेचा कौल घ्या,” अशी भावना आता चामोर्शीकरांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments