Homeगडचिरोलीहक्कासाठी रस्त्यावर उतरला बळीराजा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांचे सामूहिक जेवण.

हक्कासाठी रस्त्यावर उतरला बळीराजा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांचे सामूहिक जेवण.

SONU WALKE, DEPUTY EDITOR, LOKWAD NEWS.

 

गडचिरोली, प्रतिनिधी : भूमी अधिग्रहण व प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या प्रश्नावर न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने गुरुवारी भावनिक वळण घेतले. सुमारे पाच हजार शेतकरी, शेतमजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिवसभर ठिय्या आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

सायंकाळच्या सुमारास आंदोलनस्थळी हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलीस मुख्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर शेकडो शेतकरी आपल्या कुटुंबीयांसह पंगतीत बसून जेवण करताना दिसून आले. देशाच्या अन्नदात्याला स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर बसून जेवण करण्याची वेळ आल्याने उपस्थितांच्या भावना दाटून आल्या.

आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सहभागी सर्व शेतकऱ्यांसाठी सामूहिक जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आंदोलन दीर्घकाळ चालण्याची शक्यता लक्षात घेऊन उद्यापासून प्रत्येक शेतकरी घरून शिधा घेऊन येणार असल्याची माहिती आंदोलनाच्या नेतृत्वाकडून देण्यात आली.

“जो शेतकरी देशाच्या जनतेचे पोट भरतो, त्यालाच न्यायासाठी रस्त्यावर बसावे लागत आहे,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. शासनाच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, आंदोलनाला विविध सामाजिक व व्यावसायिक संघटनांचा पाठिंबा मिळू लागला आहे. गडचिरोली जिल्हा वकील संघाने आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये शेतकऱ्यांना निशुल्क मार्गदर्शन व मदत करण्याचे आश्वासन दिले.

याशिवाय जिल्ह्यातील डॉक्टर व आरोग्यसेवा संघटनांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली. आंदोलनादरम्यान कोणत्याही शेतकऱ्याची प्रकृती बिघडल्यास आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भूमी अधिग्रहण आणि विमानतळ प्रकल्पासंदर्भातील मागण्यांवर शासनाकडून अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता कायम आहे. मात्र न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

रस्त्यावर बसून जेवण करणाऱ्या अन्नदात्याचे हे दृश्य शासनाला जाग आणणार का आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments