SONU WALKE,DEPUTY EDITOR,LOKWAD NEWS.
चामोर्शी-हरणघाट मार्गाचे काम जोरात परंतु नियोजन शून्य
चामोर्शी, दि. 3 जून : चामोर्शी ते हरणघाट या महत्त्वाच्या मार्गाचे रुंदीकरण व बांधकामाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असले, तरी कामाच्या नियोजनातील त्रुटींमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात मुरूम टाकण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना आणि प्रवाशांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे. धुळीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असून वाहन चालवितानाही अडचणी निर्माण होत आहेत.
विशेष म्हणजे, पावसाळ्यापूर्वी रस्ता तात्पुरत्या स्वरूपात तरी वाहतुकीस योग्य करण्याची आवश्यकता असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर मुरूम चिखलात रूपांतरित होणार असून वाहनांचे घसरणे, दुचाकीस्वार पडणे तसेच अपघात होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
या मार्गाचे काम लॉयड मेटल्स कंपनीकडे असल्याने कामाला वेग आला, ही बाब निश्चितच सकारात्मक आहे. मात्र कामाच्या अंमलबजावणीमध्ये आणि वाहतूक व्यवस्थापनामध्ये अपेक्षित नियोजन दिसून येत नसल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे. समोर पावसाळा असताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करण्यात आला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, या मार्गावर सध्या मुरूम वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकांची मोठी वर्दळ सुरू आहे. अनेक ट्रकचालकांकडून बेफिकीरपणे वाहन चालविले जात असल्याची तक्रार आहे. साध्या दुचाकीस्वारांना किंवा चारचाकी वाहनांना रस्ता न देता कट मारून पुढे जाण्याचे प्रकार वाढल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासन व संबंधित कंत्राटदार कंपनीने तातडीने दखल घेऊन धुळीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि पावसाळ्यापूर्वी रस्ता सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे