चामोर्शी::- चामोर्शी शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे येथील नागरिक, व्यापारी व लघु व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. मात्र या गंभीर समस्येकडे महावितरणचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. महावितरणने लक्ष वेधून वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करावा अशी मागणी स्वाभिमानी सामाजिक संघटना चामोर्शी यांनी महावितरणचे उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, चामोर्शी शहरात गेल्या काही वर्षांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शहरातील १३२ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित होण्यास विलंब होत असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष कामाची गती अत्यंत संथ असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच डीपीडीसी निधीतून सुरू करण्यात आलेली कामे अद्याप पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी, लघु उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. चामोर्शी हा गडचिरोली जिल्ह्यातील लोकसंख्येने व विस्ताराने सर्वात मोठा तालुका आहे. येथील वीज समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून येथील वीज समस्या तत्काळ दूर करावी अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतानांना संघटनेचे अध्यक्ष राजू धोडरे, मदन मडावी, दिवाकर कोहळे, पुराण व्याहाडकर, विजय गेडाम,बाळू दुधबवरे अरुण गव्हरे, संगीता भांडेकर, साधना नैताम, सुरेखा सोनटक्के, शुक्राबाई पालकर, इंदुबाई बारसाकडे, जयश्री नैताम, लीलाबाई भांडेकर, मंदाबाई पालकर, विमलबाई पालकर,सयाबाई पिपरे,सुनंदा सोनटक्के, नागुबाई सोनटक्के, ताराबाई नैताम,लीलाबाई सोनटक्के, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शी तालुका उपप्रमुख विक्की वालदे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शी तालुका गटप्रमुख सुरज नैताम, संपर्क प्रमुख राजू राऊत व नागरिक उपस्थित होते.