SONU WALKE, DEPUTY EDITOR,LOKWAD NEWS.
चामोर्शी, प्रतिनिधी : खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत भर टाकली असून, केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात चामोर्शी येथे NSUI आणि युवक काँग्रेसच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध करत इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मशागत, पेरणी, सिंचन आणि माल वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज असते. अशा वेळी इंधन दरवाढ केल्याने उत्पादन खर्च वाढून शेतकऱ्यांचा आर्थिक कणा अधिकच कमकुवत होणार असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त असताना इंधन दरवाढ ही जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर चामोर्शी येथील एच.पी. पेट्रोल पंपासमोर NSUI व युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच इंधन दरवाढ तात्काळ कमी न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
आंदोलनाचे नेतृत्व NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी केले. यावेळी पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, युवक काँग्रेस चामोर्शी अध्यक्ष प्रेमानंद गोंगले, शहराध्यक्ष विलास चिंचघरे, विजय लाड, पीपलदास सोयाम, सुभाष कोठारे, हेमंत कोवासे, तेजस कोंडेकर, आशिष घेर, संजय बुरांडे, ओमप्रकाश चौधरी, अभिषेक वाळके, अमन लाकडे, प्रफुल बारसागडे, विनोद खोबे यांच्यासह NSUI, युवक काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राहुल वैरागडे म्हणाले, “खरीप हंगामाच्या तोंडावर करण्यात आलेली इंधन दरवाढ शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारी आहे. केंद्र शासनाने तात्काळ पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा NSUI व युवक काँग्रेसच्या वतीने अधिक तीव्र जनआंदोलन उभारले जाईल.”
दरम्यान, आंदोलनामुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले असून, इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरोधातील नाराजी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.