SONU WALKE, DEPUTY EDITOR,LOKWAD NEWS.
प्रेस नोट

चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावांमधील शेतजमिनींच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून, संबंधित शेतकऱ्यांनी शासनाकडून प्राप्त झालेल्या नोटिसींवर विहित मुदतीत लेखी आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन डाव्या लोकशाही आघाडीतील विविध पक्षांच्या नेत्यांनी केले आहे.
भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी, चामोर्शी यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या कलम ३२(२) अंतर्गत खातेदारांना नोटिसा बजावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डाव्या लोकशाही पक्षांनी म्हटले आहे की, प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पासाठी जमीन संपादनाबाबत शासनाने प्रक्रिया सुरू केली असून अनेक शेतकरी आपल्या जमिनी देण्यास विरोध करत आहेत.
पक्षांच्या मते, केवळ आंदोलन किंवा मोर्चांवर अवलंबून न राहता संबंधित शेतकऱ्यांनी कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नोटिसींना उत्तर देणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात न्यायालयीन लढाई लढताना अडचणी निर्माण होऊ शकतात, असा दावा पत्रकात करण्यात आला आहे.
डाव्या लोकशाही आघाडीने शेतकऱ्यांना भूसंपादनासंदर्भातील आपली भूमिका स्पष्टपणे लेखी स्वरूपात मांडण्याचे आवाहन केले आहे. तसेच आक्षेपपत्रामध्ये वाढीव मोबदला, नोकरी किंवा अन्य सवलतींच्या मागण्या न करता जमिनी संपादनास असलेला विरोध स्पष्टपणे नमूद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
यासोबतच काही घटकांकडून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही पत्रकात करण्यात आला असून, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सावध राहून कायदेशीर बाबींची योग्य माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार तसेच आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी संयुक्तरित्या केले आहे.