Homeगडचिरोलीनियम धाब्यावर, पोकलेनचा बेधडक वापर; महसूल यंत्रणा केवळ बघ्याच्या भूमिकेत?

नियम धाब्यावर, पोकलेनचा बेधडक वापर; महसूल यंत्रणा केवळ बघ्याच्या भूमिकेत?

SONU WALKE,DEPUTY EDITOR,LOKWAD NEWS.

“प्रशासन सुस्त, रेती ठेकेदार मस्त”.

“Administration Turns a Blind Eye, Sand Contractors Have a Free Run”.

Oplus_131072

चामोर्शी तालुक्यातील  वाघोली दोटकुली येथील रेती घाटांचा लिलाव शासनाच्या शर्ती व नियमांनुसार करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात मात्र रेती माफियांनी नियमांना अक्षरशः पायदळी तुडविल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. महसूल प्रशासनाच्या कथित दुर्लक्षामुळे या घाटांवर भरदिवसा आणि रात्रीच्या अंधारात अवैध रेती उत्खनन व तस्करीचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

विशेष म्हणजे, नियमांनुसार रेती उपसा मानवी श्रमाच्या माध्यमातून करण्याची अट असताना, प्रत्यक्षात नदीपात्रात थेट पोकलेन मशीन उतरवून मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात असल्याचे दृश्य समोर आले आहे. पोकलेनच्या सहाय्याने रेती उपसून हायवा वाहनांमध्ये भरली जात असून, ती परस्पर अवैधरित्या विक्रीसाठी पाठविली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

या संपूर्ण प्रकाराची छायाचित्रे हाती लागले असून, त्यातून रेती माफियांचा वाढता मुजोरपणा आणि महसूल प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने शासनाने मशीनद्वारे उत्खननास बंदी घातली असतानाही संबंधित नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

“महसूल विभागाला हे अवैध उत्खनन दिसत नाही का? की जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे?” असा संतप्त सवाल आता तालुक्यातील नागरिक उपस्थित करू लागले आहेत. इतक्या उघडपणे सुरू असलेल्या अवैध कारभारावर कारवाई का होत नाही, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.

रेती माफियांना महसूल प्रशासनाचे अभय आहे का? प्रशासन आणि अवैध रेती व्यावसायिकांचे अर्थपूर्ण हितसंबंध तर नाहीत ना? अशा चर्चांना आता चामोर्शी तालुक्यात उधाण आले आहे. दरम्यान, पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असताना संबंधित विभाग मात्र केवळ कागदी कारवायांपुरताच मर्यादित राहिल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.

स्थानिक प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments