SONU WALKE,DEPUTY EDITOR,LOKWAD NEWS.
गडचिरोली | प्रतिनिधी
जनजाती सांस्कृतिक समागम कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी व आदिवासी काँग्रेस कमिटीतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आदिवासी समाजाच्या इतिहास, संस्कृती व अस्मितेला कमी लेखण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. Vishwajeet Marotrao Kovase यांनी दिला.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिक्रिया देताना ॲड. कोवासे म्हणाले की, देशातील आदिवासी समाज हा भारताच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी वक्तव्ये अत्यंत दुर्दैवी आहेत. आदिवासी समाजाच्या अस्मितेशी खेळ करणाऱ्यांना भविष्यात जनता लोकशाही मार्गाने धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला.
या निषेध आंदोलनात प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, नगरसेवक नंदू कायरकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावळ, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सचिव नंदू वाईलकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, भारतीय राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसच्या सचिव कुसुम अलाम, माधुरीताई मडावी, माजी नगरसेवक विजय गोरडवार, माजी नगरसेवक संजय मेश्राम, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल भाई पंजेवाणी, माजी नगरसेवक रवींद्र किरमिरवार, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विवेक घोंगडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या निषेध आंदोलनामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.