SONU WALKE,DEPUTY EDITOR,LOKWAD NEWS.
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर येथे २६ मे २०२६ रोजी आयोजित युवा काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत वापरण्यात आलेल्या पत्रकामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या पत्रकात ऐतिहासिक दिक्षाभूमीच्या शिखरावर हिंदुत्ववादी भगवा ध्वज दर्शविण्यात आल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस पदाधिकाऱ्यांविरोधात तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे.
युवा काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला प्रभारी अजय चिकारा, प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मात्र परिषदेत वापरण्यात आलेल्या पत्रकातील दिक्षाभूमीच्या चित्रामुळे बौद्ध समाजात संतापाची लाट उसळली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सीताबर्डी पोलीस ठाण्यात निवेदन देत संबंधित काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. “दिक्षाभूमी ही समता, बौद्ध धम्म आणि कोट्यवधी अनुयायांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. तिच्या मूळ स्वरूपाशी छेडछाड करणे हे केवळ ऐतिहासिक विकृतीकरण नसून धार्मिक भावना दुखावणारे गंभीर कृत्य आहे,” असा आरोप VBAने केला आहे.
“दिक्षाभूमीचा राजकीय वापर आणि प्रतिमेचे विकृतीकरण सहन केले जाणार नाही. प्रशासनाने तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी VBAचे नागपूर शहराध्यक्ष मंगेश वानखेडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, काँग्रेसकडून याबाबत अधिकृत भूमिका काय घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.